देश अंधार युगाकडं जात आहे : जयसिंग वाघ 

107

✒️एरंडोल(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

एरंडोल(दि.17मार्च):- सध्या देशात ज्या काही घटना घडत आहेत , ज्याचे उदात्तीकरण सुरू आहे , ज्या घटनांवर चौसष्ट हजार कोटी , चौतीस हजार कोटी रुपयांची उधळपट्टी केली जाते व मूलभूत गोष्टींवर खर्चाची कपात केली जाते , न्यायाधीश लोकं मनाला पटेल तसे निर्णय देवून न्यायसंस्थेचे अवमूल्यन करू लागले आहे , शाळा बंद पाडल्या जात आहे या व अश्या कितीतरी घटना बघितल्या नंतर देश एका अंधार युगाकडं जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे असे मत प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .

         एरंडोल येथे आयोजित संविधान सन्मान परिषदेत धर्माधिष्ठित संविधान निर्मितीमुळे देशाचे सार्वभौमत्व व एकात्मता धोक्यात येते या विषयावर भाषण करतांना वाघ बोलत होते.

         जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितले की, भारताचे संविधान जगातील एक आदर्श संविधान असून देशातील प्रत्येक व्यक्तीस न्याय देणारे , त्याला प्रतिष्ठा देणारे , मानवी मूल्ये जोपासणारे , मानवतावादी तत्वे मांडणारे असतांना सुध्दा संविधाना विरोधात गरळ ओकली जात आहे या वरून या लोकांना देशात माणसांना माणूस म्हणून जगू द्यायचे नाही तर त्यांना जनावरे म्हणून जगण्यास भाग पाडणारे आहे . हा धोका आपण वेळीच समजून संविधान बदलवू पाहणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावावे असेही वाघ यांनी स्पष्ट केले. 

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे होते त्यांनी आपल्या भाषणात आम्ही संविधानप्रेमी म्हणविणारे लोक संविधान वाचाविण्या करिता ठोस कार्यक्रम घेवून पुढं जातील . संविधान या देशाचा श्वास आहे , प्रत्येक मानवाचा जीव की प्राण आहे , आपण संविधान वाचविण्यासाठी वेगवेगळ्या संवैधानिक संस्था कश्या आपल्या ताब्यात येतील याची रणनीती आखावी , आज आपल्या ताब्यात कोणतीच संस्था नाही हे आपण समजून घ्यावे .

       प्रख्यात साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड , प्रा. अशोक पवार , प्रा. डॉ. राहुल निकम , अशोक बिऱ्हाडे , डॉ. सरोज डांगे , प्रा. लीलाधर पाटील मंचावर हजर होते .

   मुख्य संयोजक प्रा. भरत शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले . राजेंद्र पारे यांनी परिचय करून दिला , भैय्यासाहेब सोनवणे यांनी आभार व्यक्त केले . कार्यक्रमास मोठ्यासंख्येने लोक हजर होते .