

▪️मुंबई येथे संपन्न झाला पुरस्कार वितरण सोहळा
✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
मुंबई(दि.27मार्च):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जाणारा सन २०२२-२३ चा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार यंदा साकोली तालुक्यातील एकोडी येथील उत्कृष्ट गायक, कलावंत, प्रबोधनकार,कवी ,संगीतकार व ग्रा.पं.सदस्य भावेश कोटांगले यांना जाहीर झाला. व्यसनमुक्ती क्षेत्रात त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण, निष्ठावान आणि प्रभावी कार्याची दखल घेत शासनाने हा प्रतिष्ठेचा सन्मान दि.२६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील नरिमन पाईंट जवळील यशवंतराव सभागृहात आयोजित विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला.
सदर पुरस्कार वितरण केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाजकल्याण आयुक्त दीपा मुंडे, आ.तुषार राठोड, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप रु. १५००० रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे असून या पुरस्काराबद्दल भावेश कोटांगले यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळणार आहे. राज्य शासनाकडून दिला जाणारा हा पुरस्कार व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो.
समाजातील व्यसनाधीनतेच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा एक महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. भावेश कोटांगले हे स्मृतिशेष प्रबोधनकार मनोजभाऊ कोटांगले यांचे लहान बंधू आहेत , मनोजभाऊ कोटांगले यांनी दिलेले सांस्कृतिक प्रबोधनाचे धडे, व पथनाट्य सादर करण्याची कलेच्या माध्यमातून गेल्या 23 वर्षांपासून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती मोहीम राबवली, व्यसनाधीन व्यक्तींना समुपदेशनाद्वारे मार्गदर्शन केले तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले.
अनेक तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना नवे आयुष्य मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांचे तुटलेले संसार पुन्हा उभे राहिले आहेत. त्यांच्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा निर्माण झाली असून, पुढील काळातही ते याच जोमाने काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यभरातून त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत असून सामाजिक, राजकीय आणि स्वयंसेवी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. व्यसनमुक्ती ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणीव करून देणाऱ्या भावेश कोटांगले यांच्या या सन्मानामुळे ही चळवळ अधिक बळकट होणार आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात हे पुरस्कार नमूद केले असल्याने त्यांचाच फायदा आज व्यसनमुक्ती जनजागृती करणाऱ्या कलावन्त मिळतो.
हा पुरस्काराचा मान माझा एकट्याचा नसून माझ्या सोबत असणाऱ्या जनजगार कला साहित्य संघटनेच्या सर्व पदाधिकारी कलावंतांचा सन्मान असल्याचे भावेश कोटांगले यांनी सांगितले.







