

▪️गायक राजेश युनिव्हर्स व संगीत ग्रुप दिल्ली यांची उपस्थिती
✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.१एप्रिल):-सहजयोग ध्यान साधना केंद्र राजुरा तर्फे सहज भक्ती संगीत व आत्म साक्षात्काराची अनुभूती कार्यक्रम राजुरा येथील जवाहर नगर, माता मंदिर वार्ड येथील खुल्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संतोष आकुलवार, रिजल समन्वयक, महाराष्ट्र समिती सदस्य, विलास शेरकुरे, जिल्हा समन्वयक चंद्रपूर, राजेश वांढरे, माजी महाराष्ट्र समिती सदस्य, राजश्री देरकर, महिला जिल्हा समन्वयक चंद्रपूर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच माजी आमदार ॲड.वामनराव चटप, नगराध्यक्ष अरुण धोटे, उप नगराध्यक्ष दिलीप देरकर यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी गायक डॉ. राजेश युनिव्हर्स व संगीत ग्रुप दिल्ली यांचा भक्ती संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विकासाच्या बौद्धिक, आर्थिक, राजकीय व तांत्रिक वाटेवर मानव अवस्थेला उत्क्रांत करण्यात पायाभूत असणारी परमेश्वर शक्ती यामध्ये दरी निर्माण झाली आहे.
ही दरी भरून काढण्यासाठी परम पूज्य माताजी श्री निर्मलादेवी यांनी सहजयोग हा आत्म साक्षात्काराचा सहज सोपा मार्ग संपूर्ण विश्वाला सांगितला आहे. संपूर्ण १४० देशांमध्ये सहजयोग कार्यान्वित आहे. मानवाचे जीवन सुख शांती समाधानात जाते. सहजयोग हा स्वतःला ओळखणे व आत्मानुभूती प्राप्त करण्याची साधी व सोपी पद्धत आहे. सहजयोग संतानी सांगितलेला योग व ध्यान साधनेद्वारा परमेश्र्वराकडे नेणारा सहज सोपा मार्ग आहे. आत्मसाक्षात्कार हा प्रत्येक मानवाचा अधिकार आहे. यामध्ये कोणताही भेदभाव नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार नंदिनी ठाकरे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हा समन्वयक विलास शेरकुरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परशुराम चन्ने, राजुरा तालुका समन्वयक, सुनंदा साळवे, राजुरा ध्यान केंद्र समन्वयक, नंदिनी ठाकरे, तालुका युवाशक्ती समन्वयक आदींसह सहजयोग ध्यान केंद्राच्या साधकांनी अथक परिश्रम घेतले.







