

▪️चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न
✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.3एप्रिल):-“एखादे यश मिळवण्यासाठी ठाम निर्धार, जिद्द आणि अंतिम शिखरावर पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले धाडस व सातत्यपूर्ण प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असतात. याच गुणांच्या जोरावर विद्यार्थी यशाला गवसणी घालू शकतात,” असे प्रतिपादन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील यांनी केले.
चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात विविध स्पर्धांमध्ये राष्ट्रीय व विद्यापीठ स्तरावर घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. संदीप पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील उपस्थित होत्या.
यावेळी चंदना मनोज नेटके या विद्यार्थिनीला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ‘विद्यार्थी विकास विभागातर्फे’ देण्यात येणारा ‘प्रथम शिक्षित विद्यार्थिनी पुरस्कार’ (रु. ५०००/- रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र) प्राप्त झाला. तसेच निरंजन रेवसिंग बारेला या विद्यार्थ्याला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व जैन इरिगेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय रांगोळी स्पर्धेत’ प्रथम पारितोषिक (रु. ५०००/- रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र) प्राप्त झाले. त्याबद्दल या दोन विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ, सामाजिक कार्यकर्ते मनोज नेटके, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार, डॉ. एम. एल. भुसारे, चेतन बाविस्कर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी पुढे बोलताना विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही असेच सातत्य टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी केले.







