पंतप्रधानांच्या हस्ते “अमृत भारत स्टेशन योजना” अंतर्गत चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाचे लोकार्पण

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22 मे):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज “अमृत भारत स्टेशन योजना” अंतर्गत देशभरातील 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण दुरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाले. राजस्थान येथील बीकानेर येथून या कार्यक्रमाचे प्रसारण झाले. व्यासपीठावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री दीया कुमारी, उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा, केंद्रिय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. सदर लोकार्पण कार्यक्रम देशभरातील विविध राज्यांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात आला असून या लोकार्पण कार्यक्रमात देशातील 18 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 103 स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.

या कार्यक्रमादरम्यान चांदा फोर्ट येथे विशेष लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, बिलासपूरचे सीई बी.व्ही.एस. सुब्रमण्यम, नागपूरचे सिनिअर डीएम एस. एन नामदेव, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, स्वतंत्र्य सेनानी डॉ. शेषराव इंगोले, दक्षिण मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच स्थानिक नागरिक व प्रवासी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात विकास पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. तसेच देशातील प्रत्येक गरीब अथवा श्रीमंत नागरिकाला आधुनिक सुविधा लाभ मिळणे हे आमचे लक्ष्य आहे. देशातील प्रत्येक भागातील स्थानकांचे आधुनिकीकरण हे केवळ पायाभूत सुविधांचे उन्नयन नसून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे पाऊल आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील 1300 हून अधिक स्थानकांचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करण्याची दीर्घकालीन योजना आहे. या माध्यमातून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्थानकांचे आधुनिकीकरण करताना स्थानिक कला, संस्कृती आणि वारसा यांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर आमदार किशोर जोरगेवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

चांदा फोर्ट स्थानकाचे आधुनिकीकरण “अमृत भारत स्टेशन योजना” अंतर्गत करण्यात आले असून, त्यामध्ये प्रवाशांसाठी पार्किंग व सर्क्युलेशन क्षेत्राचा विस्तार, विशेषतः सण-उत्सव व गर्दीच्या वेळी उपयोगी, उंच मास्ट लाइट्स – उत्तम प्रकाश व्यवस्था व सुरक्षा, बाह्य स्वरूपाचे उन्नतीकरण – चांदाफोर्टच्या ऐतिहासिक स्थापत्यशैलीत, ‘खुर्दा पॅटर्न’नुसार पारंपरिक प्रवेशद्वार, लिफ्ट व एस्केलेटर (दुसऱ्या टप्प्यात) – सुलभ प्रवासासाठी, कोळसा उद्योग व गोंड संस्कृतीवर आधारित भित्तीचित्रे व सजावट, फ्लॅग माउंट व सजावटी ध्वज – राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक, 12 CCTV कॅमेऱ्यांद्वारे वाढवलेली सुरक्षा व्यवस्था, ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजना – स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधा “अमृत भारत स्टेशन योजना”च्या माध्यमातून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या उपक्रमामुळे चांदा फोर्ट स्थानकाचा कायापालट होऊन प्रवाशांना सुसज्ज व सुरक्षित प्रवास अनुभवता येणार आहे.