

✒️कुणाल श्रवले(उमरखेड तालुका प्रतिनिधी)
उमरखेड-यवतमाळ(दि.15मे):-उमरखेड शहरातील राजापूर (टाकळी) भागात झालेल्या मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात उमरखेड पोलिसांच्या डिटेक्शन ब्रँचला (DB) मोठे यश आले आहे. या गुन्ह्यातील आरोपींना चक्क हैदराबाद (तेलंगणा) येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
•नेमकी घटना काय?
दिनांक १८/१०/२०२६ रोजी फिर्यादी श्रीमती वनिता गजानन मोहिते (वय ३०, रा. राजापूर) यांनी तक्रार दिली होती की, त्या बाहेरगावी असताना त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी कपाटाचे लॉकर तोडून:
नगदी रक्कम १,२०,००० रुपये.
सोन्याचे दागिने ४७ ग्रॅम (अंगठी, पोत, चैन, झुंबर इ.) किंमत २,३५,००० रुपये.
चांदीचे दागिने:१५ तोळे साखळ्या. असा एकूण ३,४२,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
•अशी झाली तपासाची चक्रे
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमान गायकवाड व ठाणेदारशंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोउपनि सागर इंगळे व त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली.
•तांत्रिक विश्लेषण: पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि सायबर सेल यवतमाळच्या मदतीने ‘डम्प डेटा’ व सीडीआर (CDR) चे तांत्रिक विश्लेषण केले. •गोपनीय माहिती: संशयित आरोपी घटनेनंतर फरार झाले होते. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हैदराबादमध्ये असल्याचे समजताच पोलिसांनी तिथे धाव घेतली.
•आरोपींची धरपकड आणि मुद्देमाल जप्त
पोलीस पथकाने हैदराबाद येथून मनोहर देवराव चव्हाण (वय ४६, रा. राजापूर टाकळी) याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने एका विधीसंघर्षग्रस्त बालक आणि सविता उर्फ संगीता लक्ष्मण मोहिते (रा. किनवट) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
•पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल:
१. चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने.
२. रोख रक्कम.
३. गुन्ह्यात वापरलेली होंडा सीबी युनिकॉर्न मोटार सायकल(MH-29-BA-8915) एकूण जप्त मुद्देमाल ७,३६,२०० रुपये.
यांनी बजावली मोलाची कामगिरी ही यशस्वी कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमान गायकवाड, पोनि शंकर पांचाळ, पोनि यशोधरा मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात डी.बी. प्रमुखसागर इंगळे, पोलीस कर्मचारी संघशील टेंभरे, दिगांबर गिते, आकाश पवार, महारुद्र आणि सायबर सेलचे सचिन देवकर यांचा समावेश होता. सध्या मुख्य आरोपी मनोहर चव्हाण हा पोलीस कोठडीत (PCR) असून पुढील तपास सुरू आहे.







