

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.23मे):-शहरात पेट्रोल–डिझेल टंचाईसदृश परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. आधी वाळू, माती, मुरूम वाहतूक करणाऱ्या हायवा–टिपर ट्रक व सीएनजी वाहनांच्या रांगा दिसत होत्या; मात्र सध्या शेतीच्या मशागतीसाठी आवश्यक असलेल्या डिझेलसाठी ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भर उन्हात तसेच मध्यरात्रीपर्यंत ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी आणि हातात कॅन घेऊन शेतकरी पंपावर रांगेत उभे असल्याचे चित्र दिसत आहे. शहर व परिसरातील डझनभर पेट्रोल पंपांवर डिझेलच्या शोधात वाहनधारकांची भटकंती सुरू असून ७–८ पंपांवर बांबू–बल्ल्या लावून पुरवठा बंद असल्याचे फलक लावलेले आहेत. परिणामी काही मोजक्या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळून हजारो कॅनच्या रांगा व जवळपास हजार मीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
मे महिनाभर शेती मशागतीसाठी अत्यावश्यक असलेल्या डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. पावसाळा तोंडावर असताना ही स्थिती अधिक चिंताजनक ठरत आहे. दत्त मंदिर परिसरातील पंपावर रात्री साडेनऊ वाजताही कॅन व वाहनांची मोठी गर्दी असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
सरकारकडून पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाकडून पुरवठा सुरळीत असल्याचे दावे होत असले, तरी प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवरील रांगा कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती साठेबाजीमुळे निर्माण झाली आहे की खरोखरच पुरवठ्यात घट झाली आहे, असा प्रश्न नागरिक व शेतकरी उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन डिझेल पुरवठा नियमित करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.







