

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.९जून):-मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ८४व्या वर्धापन दिनानिमित्त यंदाचे विविध पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांना पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ, निर्भीड आणि समतावादी योगदानाबद्दल मानाचा ‘युगारंभकार, सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रोख १०,००० रुपये, सन्मानचिन्ह आणि शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मूळचे यवतमाळचे असलेल्या माईणकर यांचा पत्रकारितेत ३८ वर्षांहून अधिक काळचा समृद्ध प्रवास आहे. त्यांनी ‘द फ्री प्रेस जर्नल’, ‘पीटीआय’, ‘हितवादी’ आणि ‘यूएनआय’ (मुंबई ब्युरो चीफ) अशा नामवंत संस्थांमध्ये काम केले आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे माईणकर ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘सामना’ आणि ‘देशोन्नती’ या वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करतात. ‘देशोन्नती’मधील त्यांचा ‘कटाक्ष’ हा स्तंभ गेल्या सहा-सात वर्षांपासून वाचकांमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे. नुकताच ५ मार्च २०२६ रोजी त्यांच्या ‘कटाक्ष’ लेखसंग्रहाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. माईणकर यांना यापूर्वी ‘आचार्य अत्रे पुरस्काराने’ देखील गौरविण्यात आले आहे.
हा भव्य पुरस्कार वितरण समारंभ सोमवार, २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला ‘द प्रिंट’चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार श्री. शेखर गुप्ता हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.
इतर पुरस्कार विजेते:
रामकृष्ण खांदारे (दै. नवराष्ट्र): पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती पुरस्कार (शोधपत्रकारिता)
दिगंबर सावंत (मटा, निवृत्त): कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर पुरस्कार
राजेंद्र साळसकर: समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार
संदीप पागडे (दै. सामना): तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार पुरस्कार
ज्ञानदा कदम (एबीपी माझा): बहुभाषिक ज्येष्ठ पत्रकार — सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कार (स्व. शरद वैद्य स्मृती)







