Home महाराष्ट्र आदित्य, प्रहर्ष, दुर्वा, शिवाय, अमिरत्न, दिक्षा, समरजीत व भूमी यांना ‘लोकराजा राष्ट्रीय...

आदित्य, प्रहर्ष, दुर्वा, शिवाय, अमिरत्न, दिक्षा, समरजीत व भूमी यांना ‘लोकराजा राष्ट्रीय बाल सन्मान’ जाहीर

445

▪️राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त 26 जून रोजी कोल्हापूरात वितरण

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.12जून):-बालकांमधील सृजनशीलता, कल्पकता आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देण्यात येणारा ‘लोकराजा राष्ट्रीय बाल सन्मान – २०२६’ पुरस्कार यंदा आठ बालगुणवंतांना जाहीर झाला आहे. साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या वयाला साजेशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदित्य म्हमाने, प्रहर्ष मुळे, दुर्वा राजहंस, शिवाय शितोळे, अमिरत्न मिणचेकर, दिक्षा तरटे, समरजीत जितकर आणि भूमी पासवान यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

समाजात अनेक लहान मुले-मुली विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असतात. त्यांच्या अंगी असलेल्या नवनिर्मितीक्षम वृत्तीला आणि सकारात्मक कार्याला योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच इतर बालकांनाही प्रेरणा मिळावी या हेतूने हा पुरस्कार प्रदान केला जातो. निवड झालेल्या बालगुणवंतांनी साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या दखलपात्र कार्याची नोंद घेऊन त्यांचा गौरव करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थी बालकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि दर्जेदार पुस्तकांचा संच असे आहे. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार, इतिहास संशोधक डॉ. वसंत भागवत, शिक्षक नेते भरत रसाळे, लेखक मदन पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

बालसाहित्य कलामंचच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारामुळे बालकांच्या कलागुणांना आणि कर्तृत्वाला अधिक व्यापक ओळख मिळणार असून, समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून साध्य होणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.