

दादर ते दादर हे पुस्तक आहे एका सच्च्या समाजसेवकाची, निष्ठावंत संघटना कार्यकर्त्याची, सामाजिक निकषांप्रमाणे अत्यंत कमी शिक्षण झाले असूनही ठाणे- मुंबईतील एक प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक तसेच विकासकाची प्रेरक गाथा…’ग्रंथाली प्रकाशन’तर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे ‘चरित्र नायकाचा करारी चेहरा असलेले’ मुखपृष्ठ आपल्याला खिळवून ठेवते.
‘बिल्डर’ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सर्वसाधारणपणे असलेल्या प्रतिमेला छेद देणाऱ्या, गोरगरीब, अपघातग्रस्त, आदिवासी विद्यार्थी यांना आपला व्यवसाय बाजूला ठेवून मदत (बहुतेक वेळा आर्थिक मदत) करणाऱ्या, आणि हे सर्व करीत असताना आपले विविध छंद जोपासणाऱ्या ‘राजा जाधव’ नामक अफाट व्यक्तिमत्वाचे शब्दरूप लेखक ‘दादासाहेब दापोलीकर’ या नावाने लेखन करणारे ‘श्री. सुमंत जुवेकर’ यांनी हे चरित्र लिहिले आहे.
‘दादर ते दादर’ या पुस्तकाच्या नावात दोनदा तोच शब्द कसा काय ?’ हा प्रश्न वाचकाच्या मनात येतोच येतो. अपरांत प्रदेशाची प्राचीन राजधानी शूर्पारक म्हणजेच आताचे नालासोपारा येथील ‘दादर’ (म्हणजे प्राचीन काळी नौका थांबण्याचे स्थान) ते राजाभाऊंचे सध्याचे निवासस्थान असलेले मुंबईतील ‘दादर’ उपनगर इथपर्यंतचा चरित्रनायकाचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारे हे पुस्तक- म्हणजे ‘दादर ते दादर ! ‘दहावी नापास मुलगा ते यशस्वी बिल्डर’ हा धाडसी प्रवास या पुस्तकात एकूण तेरा प्रकरणांमध्ये लेखकांने प्रवाही पद्धतीने लिहिला आहे.
‘साष्टी ते सुरत आणि सुरत ते नालासोपारा, बालपण’ या पहिल्या प्रकरणात राजाभाऊंच्या पूर्वजांचा संबंध प्रत्यक्ष शिवाजी महाराजांशी कसा आला होता, याची सुरस कहाणी वाचून आपण थक्क होतो. राजा यांचे भावंडांच्या सहवासातील, एकत्र कुटुंबातील ते दिवस म्हणजे भावुकतेने भरलेल्या रम्य आठवणी आहेत. खोडकरपणा, घरी आणि शाळेत करीत असलेले ‘नसते उपद्याप’ यासाठी संपूर्ण गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या राजाने आईच्या, मोठ्या बहिणीच्या हातचा कैकदा मार खाल्ला. पण त्यांच्यातील प्रेम कधी कमी झाले नाही. कठीण परिस्थिती असली, तरीही घरातील मोठ्या माणसांनी सर्व मुलांवर शिक्षणाचा संस्कार आवर्जून केला होता. वारंवार प्रयत्न करूनही शाळा आणि अभ्यासाचे गणित न साधलेल्या राजाने नोकरीसाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. सुरुवातीलाच हातमागावर काम करण्याची नोकरी मिळवली. नंतर काही वर्षे रिक्षा चालवली, कापड विकले, टोप्या विकल्या, दुकानही चालवले.चांगल्या मार्गांचा अवलंब करून पैसे कमवण्यासाठी राजाने कुठलीही लाज बाळगली नाही. या उद्योगीपणामध्येच पुढील आयुष्यात मिळणाऱ्या देदीप्यमान यशाची बीजे रोवली गेली होती.
त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचा अनुभव घेणाऱ्या राजाने प्रेमाचे गणितदेखील सोडवले. ‘सुरेखा’ नावाची एक गोड मुलगी राजाच्या आयुष्यात नकळत आली. सुरेखालाही रुबाबदार, तिला धाडसी राजा पसंत होता. त्या दोघांनी एकमेकांना जीवनभर साथ देण्याचा निर्णय घेतला. जातीपातीच्या संकल्पनांमुळे या आंतरजातीय विवाहाला सुरुवातीला सुरेखाच्या घरच्यांचा विरोध होता. तरीही सुरेखाने राजाला खंबीरपणे साथ दिली. सहजीवनाचे मधुर क्षण अनुभवताना त्या दोघांनाही कधी कधी कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागत होते. संसाराची, कुटुंबाची जबाबदारी पेलण्यास समर्थ असलेला राजा मोठ्या खटपटी करत होता. कुणाचे उपकार घेणे त्याला ठाऊक नव्हते. आईवडील, भावंडे या साऱ्यांच्या पाठिंब्याने राजा – सुरेखाचे जीवन गोड वळण घेत होते. संसारवेलीवर फुले उमलली होती. घराला गोकुळाचे स्वरूप आले होते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राजा कागदी पिशव्या बनविणे आणि असे छोटे छोटे व्यवसाय करत होताच. याच काळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत आणि मऱ्हाटमोळ्या नेतृत्वाचा उदय होत होता. त्यावेळच्या अनेक मराठी तरुणांप्रमाणे राजासुद्धा बाळासाहेबांकडे आणि पर्यायाने शिवसेनेकडे आकृष्ट झाला. मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये राजा सहभागी होऊ लागला.
आता ‘राजा’ ची ओळख ‘राजाभाऊ’ म्हणून होण्यास सुरुवात झाली होती. राजाभाऊंनी बंधू रमण, विजय, शरद यांच्यासहित बांधकाम व्यवसायात प्रवेश केला होता. ‘रिक्षा, दुकानदारी ते थेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ या प्रकरणात लेखकांनी बिल्डर व्यवसायातील बारकावे, खास तेथे वापरल्या जाणाऱ्या परिभाषा, त्यातील येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींवर केलेली मात असा सर्व प्रवास अचूकतेने आणि प्रभावीपणे आणि महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्राशी संबंधित नसलेल्या वाचकालाही समजेल अशा साध्या, सोप्या भाषेमध्ये मांडला आहे. बांधकाम व्यावसायिकांचे यश आणि पैसा सर्वांना दिसतो. परंतु त्यासाठी ते घेत असलेले कष्ट आणि धोके लोकांना माहीत नसतात. बांधकाम व्यवसायातील अनेक खाचाखोचा, संभाव्य धोके, जबाबदाऱ्या यांचे रंजक परंतु वास्तववादी वर्णन वाचायला मिळते.
‘समाजसेवा’ या प्रकरणात राजाभाऊंच्या आयुष्यात आलेल्या हृदयद्रावक, कठीण प्रसंगांचे वर्णन वाचताना आपणही हळवे होतो. कोणावर कशी वेळ येईल सांगता येत नाही. मात्र राजाभाऊंसारखा ‘देवदूत’ पीडितांच्या पाठीशी उभा असतो. कधी रेल्वे अपघात झाला, तेव्हा बेधडकपणे जखमी रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, गरीब, दलित, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करणे, त्यांना आर्थिक साहाय्य करणे, पालघर, जव्हार, मोखाडा, खोडाळा वगैरे शाळांना दिवाळीचा फराळ, औषधे, शिष्यवृत्ती वाटणे, तसेच रक्तदान शिबीरे उभारणे, समाजात घडणाऱ्या महत्वाच्या घटनांची दखल घेऊन त्याच्या चित्रफितींचे प्रदर्शन भरवणे, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगवान गौतम बुद्ध अशा महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी करणे, विविध आंदोलने, मोर्चे यांचे नेतृत्व करणे, मोठमोठ्या सभा आपल्या खणखणीत, बेधडक भाषणांनी गाजवणे अशी अनेक सामाजिक व्रते अंगिकारलेला हा बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक म्हणजे राजाभाऊ. निरलसपणे सेवा करण्याचे व्रत अंगीकरलेल्या राजाभाऊंना त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून १९९७ साली ‘दलितमित्र’ पुरस्कार देण्यात आला.
आयुष्य हे सरळमार्गी कधीच नसते. कधी सुखाचे हिंदोळे तर कधी दुःखाचे डोह अनुभवास येतात. पण म्हणून आयुष्य थांबत नाही. ते पुढे जातच असते. राजाभाऊंच्या आयुष्यात सुख ओसंडून वाहत असताना एक दिवस अचानक मोठे वादळ आले. त्यांच्या पत्नीचे सौ. सुरेखाताईंचे अकस्मात निधन झाले. या प्रसंगाचे आलेले वर्णन ‘भूकंप ! सुरेखाताईंचे निधन’ या प्रकरणात वाचताना आपण सारेच त्या दुःखाशी समरस होतो. राजाभाऊंच्या आयुष्यात आलेले हे कठीण वळण ! राजाभाऊ एकटे पडले होते. पण आपल्या भावना एका जागी आणि संसाराचे व्यवहार दुसऱ्या जागी. मुलांचे संगोपन, घरी येणाऱ्या – जाणाऱ्यांचे आदरातिथ्य, समाजसेवा, व्यवसाय या सगळ्या गोष्टी एकट्याने निभावणे शक्य नव्हते. यासाठी जीवनसाथीची अत्यंत आवश्यकता होती. राजाभाऊंनी दुसरा विवाह केला. या विवाहाची कथाही एखाद्या बॉलीवूड चित्रपटासारखी मनोरंजक आणि एखाद्या ‘रोलर कोस्टर राईड प्रमाणे आहे.’ सायन रुग्णालयातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.अलकाताई या त्यांच्या द्वितीय पत्नी. अलकाताईंनी राजाभाऊंच्या संसाराला योग्य दिशा दिली. अलकाताई आणि राजाभाऊंना पुत्ररत्नही प्राप्त झाले. अलकाताईंनी कधीही सख्खं अपत्य, सावत्र अपत्य असा भेदभाव केला नाही. आधीच्या लहानग्या जीवांना मायेची पाखर मिळाली, दुःखी जीवाला आधार लाभला, जीवन पुन्हा एकदा हास्य पांघरून पुढे जाऊ लागले.
‘थोरामोठ्यांचा सहवास’ या प्रकरणात राजाभाऊंच्या जीवनात आलेल्या महान व्यक्तींचा लेखकांनी परिचय करून दिला आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आनंद दिघे, मनोहर जोशी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाबासाहेब पुरंदरे, प्रमोद महाजन, बाळाराव सावरकर, आदि महान प्रभृतींशी त्याचे स्नेहबंध कसे विकसित होत गेले याचा आढावा घेतलेला आहे.
समाजसेवा, व्यवसाय आणि संसार या तीन आघाड्यांवर काम करीत असताना राजाभाऊंनी एक चौथी आघाडी उघडली होती ती म्हणते छंद जोपासण्याची ! आपले शिक्षण कमी झाले ही खंत राजाभाऊंच्या मनात होती. परंतु त्यामुळे रडत न बसता किंवा त्याचा बाऊ न करता त्यांनी ती कसर आपल्या ‘वाचन छंदाने’ भरून काढली. त्याचबरोबर राजाभाऊंनी आणखीही काही चांगले छंद जोपासले होते. ‘अनोख्या छंदाची कहाणी’ या प्रकरणात शिवकालीन नाणी, समया, शंख, शिवचरित्राची पुस्तके इत्यादी अनेक वस्तूंचा संग्रह कसा केला, त्यांनी वस्तुसंग्रहालय कसे निर्माण केले, याचे वर्णन आले आहे. राजाभाऊंचे अक्षर हा एक वेगळा कौतुकाचा विषय. कुठलेही सुलेखनाचे शिक्षण घेतलेले नसताना राजाभाऊंनी बालपणातच मराठी सुलेखन कौशल्य (calligraphy) आत्मसात केली आहे. त्याचाही पुढे त्यांना व्यवसाय आणि संघटना यामध्ये अत्यंत उपयोग झाला. राजाभाऊंचे हस्ताक्षर या पुस्तकामध्ये एका पानावर छापलेले आहे. राजाभाऊंनी स्वतःच्या सुवाच्य हस्ताक्षरात लिहिलेले उतारे, अनेक सुविचार, सुभाषिते, परिच्छेद स्वतःकडे यांचे संकलन केले होते. त्यातूनच ‘सहज सुचलं म्हणून….’ ही तीन पुस्तकांची एक मालिका त्यांनी प्रकाशित केली आहे. राजाभाऊंच्या नालासोपारा येथील निवासस्थानी त्यांचे स्वतःचे सुसज्ज वाचनालय आणि त्याचबरोबर एक संदर्भ ग्रंथालयही आहे. येथे पाच हजारपेक्षा अधिक पुस्तके आहेत. राजाभाऊंचे हे वाचनालय, वस्तुसंग्रहालय तसेच त्यांचे संदर्भ ग्रंथालय पूर्वसूचनेने कुणालाही पाहण्यासाठी आणि उपयोगासाठी उपलब्ध आहे.
अशा विविध प्रकरणांतून राजाभाऊंची ही जीवनयात्रा येऊन ठेपते ‘राजा माणूस’ ह्या प्रकरणाशी.. कधी उद्योगी तर कधी कुटुंबवत्सल, कधी सच्चा समाजसेवक तर कधी बांधकामाच्या साईटवर कामगारांचे प्रश्न सोडवताना आढळणारा बांधकाम व्यावसायिक अशी विविधांगी रूपे ते साकारताना राजाभाऊंच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्यासमोर येत जातात. लहानपणापासूनच अर्थार्जनासाठी नाना उद्योग करणारे हे प्रेरक व्यक्तिमत्व तरुणांसाठी मोठे प्रेरणास्थान आहे. ‘कष्टाविण फळ ना मिळते’ ह्या उक्तीची यथार्थता हे पुस्तक वाचत असताना आपल्याला ठाई ठाई जाणवत राहते.
आजही दादरच्या रहदारीच्या विभागात असलेल्या जाधवबंधूनी बांधलेल्या ‘गार्डन कोर्ट’ या उत्तुंग इमारतीच्या तिसाव्या मजल्यावर राजाभाऊंची स्वारी कधी पुस्तक वाचनात मग्न तर कधी हस्ताक्षराचे अप्रतिम नमुने साकारण्यात व्यग्र असलेली पाहायला मिळते. तुम्ही कधीही तेथे जा. तुमचे स्वागत होतेच. आपण रंगून जातो तो पुस्तकांचा प्रचंड संग्रह पाहून, हरवून जातो तो शिवकालीन नाण्यांचा संग्रह बघून, अशा ह्या चरित्रप्रवासाचे आपणही वाचन साक्षीदार व्हायलाच हवे. एकूणच हे पुस्तक ओघवती भाषा, आकर्षक रंगसंगती, अक्षराचा पोत, बांधणी, सामाजिक मूल्य अशा अनेक निकषांवर पूर्णपणे उतरते. लेखक दादासाहेब दापोलीकर यांनी सहजसोप्या, प्रवाही, प्रभावी शैलीत लिहिलेल्या एका समाजसेवकाच्या, एका सच्छील, उद्यमशील माणसाच्या कार्यकर्तृत्वाचा चढता आलेख प्रत्येकाने वाचायलाच हवा.
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन – किंमत : #७५०
✒️रवींद्र मालुसरे(अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ,मुंबई)मो:-९३२३११७७०४







