शिक्षण महाविद्यालयातून आदर्श शिक्षक घडविणे आवश्यक- प्रा. डॉ. संजय खडसे

64

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.3जुलै):- श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष स्व. वसंतराव धोत्रे यांनी माझी प्राध्यापकपदी केलेल्या निवडीला मी यथोचित न्याय देऊन श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयाच्या उन्नतीकरिता अथक परिश्रम घेतले. डॉ पंजाबराव देशमुख यांच्या स्वप्नातील आदर्श शिक्षक या शिक्षण महाविद्यालयातून घडविण्याचा सतत प्रयत्न केला. भाऊसाहेबांचे हे स्वप्न साकार करणे आज आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे हित जोपासून सदोदित त्यांना प्रामाणिकपणे मार्गदर्शन केले. कष्टकरी व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यास विषयक व आर्थिक मदतीतून उभारी दिली त्यातील अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर स्थिरस्थावर झाले आहेत याचे मला समाधान वाटते. असे विचार प्रा.डॉ.संजय खडसे यांनी आपल्या सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी मनोगतातून व्यक्त केले.

               ते स्थानिक श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात ३३ वर्षातील शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती सोहळ्यात सत्कारास उत्तर देताना दि.३० जून २०२५ ला विचार व्यक्त करीत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचे स्वीकृत सदस्य तथा डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष प्रा. नरेशचंद्र पाटील, प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय राऊत, सत्कारमूर्ती प्रा. डॉ.संजय खडसे, सौ.अनिता खडसे, अनिरुद्ध खडसे, सिद्धांत खडसे हे विचारमंचावर उपस्थित होते.       

       अध्यक्ष,प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती डॉ.संजय खडसे यांच्या हस्ते डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस हरार्पण करून अभिवादन करण्यात आले आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांनी केले.

       या प्रसंगी महाविद्यालयातर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.नरेशचंद्र पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सेवापूर्ती कार्यक्रमात सत्कारमूर्ती प्रा.डॉ.संजय खडसे यांचा प्राचार्य डॉ.विनय राऊत व प्रा.नरेशचंद्र पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील जेष्ठ प्रा. डॉ.वनिता काळे यांच्या हस्ते सौ. अनिता खडसे यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

             सुप्रसिद्ध अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांनी डॉ. संजय खडसे यांच्या जीवनपटावर स्वरचित अभंग गाऊन उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि स्वरचित ” निखारा ” हा काव्यसंग्रह भेट देऊन डॉ.संजय खडसे यांचा सत्कार केला.

        आपल्या मनोगतात प्रा.डॉ. संजय खडसे म्हणाले की, स्व. वसंतराव धोत्रे महाविद्यालयात कार्यक्रम प्रसंगी यायचे तेव्हा ‘एका कलदार’ माणसाची मी निवड केली असे आपल्या भाषणातून उपस्थितांना आवर्जून सांगायचे याची आठवण सांगून महाविद्यालयाच्या विकासाकरिता प्रामाणिकपणे सेवा दिल्याचे या प्रसंगी ते म्हणाले. आई पार्वताबाई व वडील भीमरावजी खडसे यांच्या सुसंस्कारातून प्रत्येकाला मदत करावी, सर्वांचे हित जोपासावे, कोणाचेही वाईट होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे अशी शिकवण आई-वडिलांची असल्याने त्याचे तंतोतंत पालन केल्याचेही प्रा. डॉ. संजय खडसे याप्रसंगी म्हणाले. 

         याप्रसंगी अध्यक्ष प्रा. नरेशचंद्र पाटील, डॉ.किशोर क्षत्रिय, प्रा.अरुण बुंदेले, श्री राजेश जामनिक यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमूर्ती डॉ. संजय खडसे यांच्यावर प्रकाश टाकला.

 डॉ.संजय खडसे माणुसकी जपणारा माणूस-प्रा.नरेशचंद्र पाटील

        आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रा.नरेशचंद्र पाटील म्हणाले की, माझे मित्र व बॅकेतील सहकारी प्रा. डॉ. संजय खडसे यांचा गोतावळा फार मोठा असून डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन बँकेच्या निवडणुकीत प्रचाराप्रसंगी याची प्रचिती आम्हाला येत होती. प्रा. डॉ. खडसे माणुसकी जपणारा माणूस असून प्रत्येकास मदत करण्याचा त्यांचा स्थायीभाव आहे. आपण प्रगतीच्या शिखरावर पोहोचलो असताना मित्रांनाही प्रगतीचा मार्ग दाखविणारं असं हे व्यक्तिमत्व आहे असे विचार व्यक्त केले.

—–

 डॉ.संजय खडसे अष्टपैलू व्यक्तिमत्व-प्राचार्य डॉ.विनय राऊत

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.विनय राऊत म्हणाले की, डॉ.संजय खडसे यांचे व्यक्तित्व अष्टपैलू आहे. विविध कलागुणांनी ते संपन्न आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी आहे. अध्यापनासह विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार निर्माण व्हावेत यासाठी त्यांची सदैव धडपड असायची. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थी तरबेज व्हावा याकरिता ते कटाक्षाने लक्ष द्यायचे असे विचार व्यक्त केले.

—–

डॉ.संजय खडसे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक- डॉ.किशोर क्षत्रिय

          महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा.डॉ. किशोर क्षत्रिय याप्रसंगी म्हणाले की, डॉ. संजय खडसे हे अत्यंत विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असून माणसाने समाजाभिमुख कसे जगावे ? यांचे मूर्तीमंद उदाहरण आहे. विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणे त्यांच्या ठायी रुजलेले आहे. शैक्षणिक मदतीसह त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना, माझ्यासह अनेकांना आर्थिक मदत केलेली आहे. प्राचार्य असताना सर्वांना समान न्याय व सन्मान देऊन त्यांनी आपली प्रशासकीय छाप पाडली आहे.असे विचार व्यक्त केले.

प्रा.डॉ.संजय खडसे एक बहुआयामी व्यक्तिमत्व – प्रा.अरुण बुंदेले

        प्रा.डॉ.संजय खडसे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.त्यांनी पथावर प्रबोधनपर कवी संमेलन घेऊन पथकवी संमेलनाचा व पथनाट्याचा प्रारंभ केला होता.नाटकांमध्ये विविध पत्रांची भूमिका दमदारपणे साकारली होती. त्यांनी श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयातून हाडाचे शिक्षक घडवण्याचे कार्य केले. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय झाले. आदर्श अध्यापनातून त्यांनी संस्कृतीचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला.असे विचार प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

           याप्रसंगी महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक श्री राजेश जामनिक यांनी प्रा.डॉ.संजय खडसे यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देऊन कार्यालयीन कामकाजात ते सतत मदत करीत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

        डॉ.संजय खडसे यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित त्यांचे गुरुवर्य माजी प्राचार्य डॉ. निर्मला वानखडे, माजी प्राचार्य डॉ. हरिकांता महल्ले, माजी प्राचार्य डॉ. मीना रोकडे, माजी ज्येष्ठ लिपिक श्री मधुकर काळे मामा यांच्या सह महाविद्यालयातील डॉ.वनिता काळे, प्रा.डॉ.किशोर क्षत्रिय, प्रा. डॉ. संगीता बिहाडे, प्रा.डॉ. अमित गावंडे, प्रा.डॉ.अंजली ठाकरे, ग्रंथपाल डॉ. माधुरी देशमुख, लिपिक श्री राजेश जामनिक,सौ.सुनीता गावंडे, श्री संजय बोबडे, श्री ईश्वर बोंडे, श्री प्रतीक वानखडे महाराज, श्री आयुश धनवटे, प्राचार्य डॉ. सुरेश गाडे, प्राचार्य डॉ. सुजाता तायडे, प्राचार्य डॉ.संजय शेजव, प्राचार्य डॉ. नीलिमा अंबाडकर, प्राचार्य डॉ. विशाल इंगळे,प्राचार्य प्रफुल्ल तरेकर, प्रा.डॉ. मुस्ताक शहा, प्रा. डॉ. नितीन वाठोरे,प्रा. डॉ. ज्योती खंडारे, प्रा. अंकिता कांबळे आदींनी प्रा.डॉ. संजय खडसे व सौ.अनिता खडसे यांचे पुष्पगुच्छ देऊन व भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विनय राऊत, संचालन ग्रंथपाल डॉ.माधुरी देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.अंजली ठाकरे यांनी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.