टपाल विभाग व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ लिमिटेड (एमएसएसआयडीसी) यांच्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या स्पर्धात्मकता वाढीसाठी सामंजस्य करार

60

 

मुंबई, (22 ऑगस्ट)-टपाल विभाग व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ लिमिटेड (एमएसएसआयडीसी) यांनी महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) स्पर्धात्मकता वृद्धीसाठी परस्पर सहकार्यास बळकटी देण्यासाठी धोरणात्मक सहकार्य करार केला आहे. हा उपक्रम रेझिंग अँड एक्सीलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स (आरएएमपी) कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात आला असून, संस्थात्मक सहकार्यातून एमएसएमई स्पर्धात्मकता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने करण्यात आलेला सामंजस्य करार (एमवोव्ही ) महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह; एपीएमजी (बिझनेस डेव्हलपमेंट), इंडिया पोस्ट, डॉ. सुधीर जी. झाकरे आणि एमएसएसआयडीसीच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालिका प्रशाली जाधव दिघवकर यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली .

या सहकार्याअंतर्गत टपाल विभाग व एमएसएसआयडीसी हे संस्थात्मक स्तरावर रॅम्प कार्यक्रमांतर्गत ‘नॉलेज पार्टनर’ नियुक्त करण्यासोबतच एमएसएमईंना टपाल व लॉजिस्टिक उपाययोजनांविषयी जागरूक करणे, तसेच महाराष्ट्रभरातील उद्योगांना विश्वासार्ह, किफायतशीर व विस्तृत पोहोच असलेली लॉजिस्टिक मदत उपलब्ध करून देणार आहेत. या भागीदारीतून लघुउद्योग, कारागीर व उद्योजक यांचे बाजारपेठेशी संबंध अधिक दृढ करण्यात येणार आहेत.

 

या प्रसंगी बोलताना, दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी अधोरेखित केले की हा उपक्रम एमएसएमईंना भेडसावणाऱ्या लॉजिस्टिक आणि ज्ञानातील दरी भरून काढण्यात मदत करेल, ज्यामुळे त्यांना केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही आपला व्यवसाय विस्तार करण्यास सक्षम केले जाईल. टपाल विभाग हा भारताच्या संपर्क आणि वित्तीय समावेशन चौकटीचा आधारस्तंभ राहिला आहे. 1.65 लाखांहून अधिक टपाल कार्यालयांचे विशाल जाळे ही जगातील सर्वांत मोठी टपाल यंत्रणा असून, केवळ मेल आणि पार्सल सेवा पुरवत नाही तर लघु बचत योजना, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (पीएलआय), ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (आरपीएलआय) यांसारखी वित्तीय उत्पादने देखील उपलब्ध करून देते आणि भारत सरकारच्या वतीने थेट लाभ हस्तांतरण (डिबीटी) योजनांसाठी एक महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून कार्य करते.

 

एमएसएसआयडीसीने महाराष्ट्रातील लघुउद्योगांच्या प्रोत्साहन आणि संवर्धनाचे मोठे कार्य केले आहे. राज्यभरातील जवळपास 30 हजार लघुउद्योग युनिट्सना त्यांनी सहाय्य केले असून , लघुउद्योगांना मदत करणे, वित्तपुरवठा करणे, संरक्षण देणे आणि प्रोत्साहन देणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कॉर्पोरेशनने पारंपरिक हस्तकलेच्या पुनरुज्जीवन आणि प्रोत्साहनातही महत्त्वाचे योगदान दिले आहे, तसेच कारागीर आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण, उद्योजकता विकास आणि विपणन सहाय्य उपलब्ध करून दिले आहे.

इंडिया पोस्टचे विपुल सी. मंडलेशा तसेच केपीएमजीच्या शताब्दी कुमारी आणि राशिद रेहान सिद्दीकी या प्रसंगी उपस्थित होते. हा उपक्रम एमएसएमईंना भेडसावणाऱ्या लॉजिस्टिक आणि ज्ञानातील दरी भरून काढेल आणि त्यांना भारतात तसेच जागतिक स्तरावर बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढविण्यास सक्षम करेल, असे यावेळी दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी अधोरेखित केले. हे सहकार्य महाराष्ट्रातील एमएसएमईंसाठी एक सक्षम परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असून आजच्या गतिमान बाजारपेठेच्या वातावरणात स्पर्धात्मक, लवचिक आणि विकासाभिमुख ठरेल.