राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चित्रपटात चिमूर, गोंदाड्याचा समावेश करावा

99

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.9ऑगस्ट):-वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्यावर महाराष्ट्र शासनाच्यावतीने चित्रपट निर्माण होत आहे असे कळते.

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जीवनपट व कार्य फार महान आहे. तसेही ते दिर्घ आहे. अगदी बालपणापासून तर ५९ वर्षापर्यंतचे प्रसंग एका तीन तासाच्या चित्रपटात येणे ही तशी अशक्यप्राय बाब आहे, परंतू त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग सुटू नये असे वाटते.

         त्यांचा जन्म यावली येथे झाला बालवयात ते रामटेक, चिमूर व गोंदाडा या भागात आले.चिमूर येथील १९४२ चा इंग्रजांच्या विरोधातील स्वातंञ्यलढा, तपोभूमी गोंदोडा येथील साधना व वाघाशी मॆञी असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात. महत्त्वाचे आहेत, असे प्रसंग चित्रपट निर्मात्यांनी सोडू नये असे मत प्रचारक राजेंद्र मोहितकर गुरूजी चिमूर यांनी व्यक्त केलेले आहे.

        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचेवर चित्रपट काढण्याची घोषणा गेल्या ५० वर्षांपासून अनेकांनी केली, परंतू आजपर्यंत प्रत्यक्षात चिञपट प्रदर्शित झाला नाही हे फार मोठे दुर्देव असल्याची खंत राजेंद्र मोहितकर यांनी व्यक्त केलेली आहे. घोषणा अनेक लोक करतात, पण ती पूर्णत्वास जात नाही. आजवर अनेक संतांवर, थोरपुरूषांवर चिञपट प्रदर्शित झाले.

        परंतू यासर्व संतामध्ये असलेला एक कोहिनूर हिरा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर चित्रपट निर्माण होवू शकला नाही.महाराष्ट्र शासन अर्थसहाय्य देवून हा चित्रपट प्रदर्शित करीत आहे ही आनंदाची बाब आहे, पण ती पूर्णत्वास जावी ही अपेक्षा आहे.