जांभुळणी परिसरात विजेचा लपंडाव – शेतकरी हैराण! आंदोलनाचा पवित्रा

77

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड-सातारा(दि.4ऑगस्ट):-माण तालुक्यातील जांभुळणी व परिसरातील शेतकरी सध्या महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे अत्यंत त्रस्त झालेले आहेत. शेनवडी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या जांभुळणी फिडर व महाबळेश्वरवाडी फिडरवर सतत तांत्रिक बिघाड होऊन नियमित वीज पुरवठा कोलमडलेला आहे. अनेकवेळा दोन-दोन दिवस वीज गायब असते, आणि ती आली तरी ती इतक्या कमी दाबाने येते की शेती पंप सुरू होत नाहीत.

या विजेच्या लपंडावामुळे जांभुळणी, महाबळेश्वरवाडी, गंगोती,पुळकोटी, देवापूर, पळसावडे यासारख्या गावांतील शेतकऱ्यांची उभी पीक जळून जात आहे. लाखो रुपयांचे नुकसान होत असून शेतकरी मानसिकदृष्ट्या हतबल झाले आहेत. महावितरणकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही संबंधित अधिकारी गंभीरतेने दखल घेत नाहीत. फोन न उचलणे, उर्मट वागणूक आणि जबाबदारी झटकण्याचा प्रकार वारंवार घडतो आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महावितरणने शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडविल्यास महावितरणच्या कार्यालयात जनावरे सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महेश करचे म्हणाले, “महावितरणच्या विरोधात आम्ही वारंवार आंदोलन केले, निवेदने दिली, बैठका घेतल्या. पण आमच्या शेतकऱ्यांचा सातत्याने छळ सुरू आहे. वीज नसल्यामुळे पीक हातातून जातंय. आमचा संयम संपत चालला आहे. आता शेतकरी रस्त्यावर उतरतील.”

शेतकरी अतुल झिमल (गंगोती):

“आमच्याकडे वीज येते ती इतक्या कमी दाबाने की मोटार सुरूच होत नाही. अधिकारी उर्मट उत्तरे देतात. फोन उचलत नाहीत. महावितरणमुळे आमची शेती बुडते आहे.”

शेतकऱ्यांचे मागणी आहे की 1. नियमित आणि पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा.

2. फिडरवरील तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करावा.

3. संपूर्ण उपविभागाचा आढावा घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

4. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निर्णय घ्यावा.

जर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास, १५ ऑगस्टपासून तीव्र आंदोलन करून महावितरण कार्यालयात जनावरे सोडण्याचा इशारा महेश करचे यांनी दिला आहे