

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.11ऑगस्ट):-चिमूरवरून हिंगणघाटकडे जाणारा मार्ग व्हाया खडसंगी- आमडी-कोरा हा वाहतुकीस योग्य नाही. अनेक दिवसापासून या रस्त्याचे काम सुरू आहे, परंतू ते अजुनही पूर्ण झालेले नाही.
दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनांसाठीही हा रस्ता धोकादायक झालेला आहे. या रस्त्याने जाणारी वाहने ही भिसी-सिर्सी-गिरड- समुद्रपूर-जाम-हिंगणघाट या मार्गाने जातात. तसा हा मार्ग लांब पल्ल्याचा पडतो. परंतू मार्ग चांगला असल्यामुळे बहुतेक लोक या मार्गानेच जाणे पसंद करतात.
परंतू खडसंगी ते कोरा, हिंगणघाट यादरम्यान असलेल्या गावांना नाईलाजाने चिमूर-खडसंगी- कोरा—हिंगणघाट याच मार्गाने जावे लागते. हा रस्ता राज्य महामार्ग आहे. परंतू रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.
या परिसरातील लोकांनी सदर रस्त्यासाठी अनेकदा आंदोलने केलेली आहेत. तरी बांधकाम विभाग व संबधित जबाबदार यंत्रणेने या रस्त्याच्या बांधकामास सर्वोच्च प्राधान्य देवून या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे व या भागातील लोकांची त्वरित त्रासातून मुक्तता करावी.



