टाटा पॉवर कंपनी विरोधात कामगारांचा एल्गार ; कुटुंबियांसह स्वातंत्र्य दिनापासून आमरण उपोषण

99

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*

 

म्हसवड ( सातारा ) :- माण तालुक्यातील पळसावडे गावातील टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीविरोधात स्थानिक कामगारांचा संताप उफाळून आला आहे. विकास व रोजगाराच्या आश्वासनांवर शेती गमावलेल्या या स्थानिकांना आता संघर्ष करावा लागत असून, कंपनीवर अन्याय व शोषणाचे गंभीर आरोप होत आहेत. याच पाश्वभूमिवर आता आंदोलानाचा पावित्रा घेतला आहे. येत्या 15 तारखेला सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरवात होणार आहे.

भूमिपुत्र व प्रामाणिक कामगार शिवाजी जाधव यांना कोणतेही ठोस कारण न देता नोकरीवरून कमी करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याशिवाय इतर अनेक कामगारांना पगारवाढ, आरोग्य विमा आणि सामाजिक सुरक्षेच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचेही उघड झाले आहे. सुरक्षा रक्षकांना गेल्या तीन वर्षांपासून पगारवाढ मिळालेली नाही, सहाय्यक कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता झालेली नाही, तसेच कोणताही आरोग्य विमा, आरोग्य सुविधा किंवा सामाजिक सुरक्षा लाभ दिला गेलेला नाही, अशी कामगारांची तक्रार आहे.

सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी सांगितले की, “कंपनीने ३० जून २०२५ पर्यंत सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे कंपनीचे कामगार त्यांच्या कुटुंबियांसह आमरण उपोषणास करणार आहेत.

या आंदोलनातून शिवाजी जाधव यांची पुनर्नियुक्ती, सर्व कामगारांना दरवर्षी २० टक्के पगारवाढ व मागील तीन वर्षांचा फरक, आरोग्य विमा व कायदेशीर हक्कांची अंमलबजावणी, स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी सन्मानजनक रोजगार आणि पूर्वी दिलेल्या सर्व आश्वासनांची अंमलबजावणी या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

करचे यांनी इशारा दिला की, टाटा पॉवर कंपनीने भूमिपुत्र कामगारांना न्याय न दिल्यास या लढ्याचे परिणाम गंभीर होतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व कंपनीवर असेल.