राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

81

▪️गिरणाचे आवर्तन सोडण्याची केली मागणी…

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.13ऑगस्ट):- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गिरणेचे आवर्तन सोडण्यात यावे, या संदर्भात निवेदन देण्यात आले.

                  याबाबत सविस्तर वृत्त असे की, आजपर्यंत कालवा समितीची बैठक तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच पाणी सोडले जात असे परंतु यावेळी चाळीसगाव एमआयडीसीसाठी १५०० क्यूसेक पाणी सोडण्याचा प्रसंग इतिहासात पहिल्यांदाच घडला. जर या १५०० क्युसेक पाण्यात अजून १५०० क्युसेक पाणी ऍड केले तर एक आवर्तन सोडता येईल ज्याचा लाभ धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना होऊन पिकांना जीवनदान मिळेल. गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाअभावी परिसरातील शेतकरी आपली पिके वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. धरणगाव, एरंडोल, पाचोरा, भडगाव, चोपडा, अमळनेर इ. तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी स्वरूपाचे आहे.

अशा परिस्थितीत गिरणा धरणातून पाटाचे आवर्तन सोडल्यास असंख्य शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष धरणगाव च्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रखडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल, पिकांचे झालेले नुकसान, गुरांच्या चारा व पाण्याची समस्या निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष भोसले यांची भेट घेत शेतकऱ्यांची व्यथा मांडली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्याचा शब्द श्री भोसले यांनी दिला. जर यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला नाही तर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देखील देण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, महिला तालुकाध्यक्षा आशा पाटील, उद्योजक एकनाथ पाटील, कॉन्ट्रॅक्टर मोहीत पवार, शिरसोलीचे महेश बोरसे, धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील उपस्थित होते.