

✒️अंबाजोगाई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अंबाजोगाई(दि.27ऑगस्ट):- अखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटन मार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत अंबाजोगाईच्या नंदन विजय नावंदर याने नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
याबाबत सविस्तर असे की, अखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटन मार्फत नृत्य, कविता, वाद्यकला, मिस्टर अँड मिसेस माहेश्वरी या सारख्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे दिव्यांगांसाठी सुद्धा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. समाजातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धा आधी जिल्हा पातळीवर व नंतर राज्य पातळीवर झाल्या. काल राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा संपन्न झाल्या.
राष्ट्रीय पातळीवरच्या नृत्य स्पर्धेत एकूण ३१ स्पर्धक वेगवेगळ्या राज्यातुन सहभाग झाले होते. यात अंबाजोगाईच्या नंदन विजय नावंदर याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आपल्या नृत्याचा अविष्कार दाखवून परीक्षकांची मने जिंकली व राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला. राष्ट्रीय पातळीवरची ही स्पर्धा काल हैदराबाद येथे संपन्न झाली. नंदन नावंदर याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.



