

जगदीश का. काशिकर, विशेष प्रतिनिधी, मो. ९७६८४२५७५७.
नागपूर – अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, विदर्भ प्रांताच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक आणि साहित्यिक अविनाश पाठक*लिखित ‘शह काटशह’ या राजकीय कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता आर. एस. मुंडले धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर उपस्थित राहणार असून दै. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित आणि आकाशवाणीचे निवृत्त उपसंचालक वृत्त आणि साहित्यभारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री नीतीन केळकर या पुस्तकावर भाष्य करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य भारती विदर्भ प्रांताचे अध्यक्ष एड. लखनसिंह कटरे हे राहणार आहेत.
अविनाश पाठक यांचे शह काटशह हे पंधरावे पुस्तक असून तिसरा राजकीय कथांचा संग्रह आहे. शह काटशह हे पुस्तक नागपूरच्या लाखे प्रकाशन (निशिगंधा बुक एजन्सी)ने प्रकाशित केले आहे. अविनाश पाठक यांचे यापूर्वी दाहक वास्तव, कालप्रवाहाच्या वळणांवरून, मागोवा घटितांचा आणि दृष्टिक्षेप हे चार वैचारिक लेखांचे संग्रह, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश, आठवणीतले नेते, थोडं आंबट थोडं गोड आणि हितगुज हे ललित लेखसंग्रह, पूर्णांक सुखाचा ही लघु कादंबरी मराठी वांङमय व्यवहार: चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक, काळ्या कोळशाची काळी कहाणी हे देशात गाजलेल्या कोळसा घोटाळ्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक, तर सत्तेच्या सावलीत आणि डावपेच हे राजकीय कथासंग्रह अशी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या यातिल काही पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्कारासह विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे. याशिवाय पत्रकारितेतील योगदानासाठी अविनाश पाठक यांना नागपूरकर भोसले परिवाराचा राजरत्न पुरस्कार नाशिक येथील पत्रकार संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार, अरविंद बाबू देशमुख प्रतिष्ठानचा पुरस्कार, मातोश्री प्रतिष्ठानचा पत्ररत्न पुरस्कार, दर्पण पुरस्कार, पत्रभूषण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला साहित्य प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य भारती विदर्भ प्रांताचे कार्याध्यक्ष चंद्रकांत लाखे, प्रांत मंत्री सुनील शिनखेडे, कार्यालय मंत्री विनय माहूरकर आणि संघटन मंत्री डॉ चंद्रशेखर भुसारी प्रभृत्तींनी केले आहे.



