

आजचे शिक्षक हे पूर्वीच्या शिक्षकांपेक्षा सरस आहेत का? हे सांगणे खूप अवघड झाले आहे. आधी पण शिक्षक चांगले होते आणि आता सुद्धा शिक्षक चांगले आहेत. प्रत्येक नोकरी प्रमाणे काही शिक्षक आधी पण चांगले नव्हते आणि आता सुद्धा चांगले नाहीत. आधी शिक्षकांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागायचे आणि पदोन्नतीच्या संधी कमी होत्या. पण आता तसे नाही. शिक्षकांना चांगला पगार आहे. पदोन्नतीच्या संधीही उपलब्ध आहेत. कार्यक्षम आणि मेहनत घेणा-या व्यक्तींची नेमणूक होण्याची गरज आहे. शिक्षक हा आपल्या ज्ञानार्जनातून पिढी घडवत असतो. म्हणून फक्त सर्वोत्तम व्यक्तींनीच या क्षेत्रात उतरावे.
पण दुर्दैवाने नेमणुका करतांना बोकाळलेला भ्रष्टाचार बघता नवीन रुजू होणारे बहुतांशी शिक्षक पैसा देऊन ती नोकरी विकत घेत असतात. मग लाखो रुपये देऊन नोकरीला लागलेल्या शिक्षकांकडून तो चांगले शिकविल ही अपेक्षा आपण कशी करावी? चांगला पगार आहे, सर्वोत्तम व्यक्तींची निवड करून नेमणूक केली, तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक मिळतील. पण तसे होताना दिसत नाही. इतर नोकरीत आठवड्यात ४० तास काम करावे लागते. तुलनेत शिक्षकांना काम कमी असते. शिक्षकांनी त्या फावल्या वेळेचा उपयोग स्वतःला अद्यावत करण्यासाठी वापरावा ही अपेक्षा असते. त्यांचे काही मित्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळात आहेत. अभ्यासक्रम बदलायचा तथा अद्यावत करण्याचा प्रयत्न केला तर प्राध्यापक मंडळी विरोध करतात. कशाला आमचे काम वाढवता असे त्यांचे म्हणने असते. कारण कधीतरी दहा-पंधरा वर्षांपूर्वी एखाद्या हुशार विद्यार्थ्याने तयार केलेल्या नोट्स वापरून शिकवण्याची सवय झालेली असते.
आज फार फरक दिसून येतो. निश्चितपणे चांगल्याकडून वाईटपणाकडे झाला आहे. शिक्षकातील काहीजण त्यांच्या वागण्यामुळे मान देण्यास पात्र नाहीत, तर अट्टल गुन्हे आणि गैरवर्तन करणारे आहेत. शिक्षक म्हणून पदाचा गरिमा म्हणजे पदाचा आब राखणे, पदाची गरज, पावित्र्य व शान राखणे हे खरे तर त्यांचे कर्तव्य आहे. पण यातच अनेक जण वाईटरित्या उघडे पडतात. जसे दारू पिऊन मुलांसमोर येणे, आश्रम शाळेत मुलींबरोबर बलात्कार करणे, व्यसन करणे, शाळांतील पैसा खाणे, न शिकवणे, वाईट भाषा वापरणे, पेपर फोडणे, पैसे घेऊन मार्क देणे, मुलांकडून घरची कामे करून घेणे, बेशिस्त वर्तन, मुलींना फुस लावून पळवून नेणे अशा काही प्रकरणातून त्यांचे गुण उघड होताना दिसून येते.
जर शिक्षक त्यांचे काम व्यवस्थित करत नसतील तर त्यांना सरळ टर्मिनेट करावे. कारण शिक्षकच आता खोट्या गोष्टी करून, भ्रष्टाचार करून टीईटी देतात. त्यात खोटेपणा करतात. आता शिक्षकांना परीक्षा नको म्हणतात. मुलांच्या खोट्या हजेरी लावून पगार घेणे, मुलींशी गैरवर्तन करणे असे सर्व दुर्गुण हल्ली त्यांच्यात भरले आहेत. हे पेपर मध्ये येणा-या विविध बातम्या वाचून कळते. खांद्यावर हात ठेवणे हे त्या व्यक्तीचे गुण जेव्हा मुलांसमोर येतात तेव्हा आदर्शच असावे. जसे तोंडात पानाचा तोबरा, हातात सिगरेट हे सर्व चुकीचे आहे. त्यांच्या वागण्यामुळे आज असे करणारे शिक्षक त्यांचा मान सन्मान हरवून बसले आहेत आणि आदरयुक्त मानसन्मान मिळवणे नाही, तर नाव कमावणे ही पूर्णपणे त्यांचीच जबाबदारी आहे.
पूर्वी शाळेतला शिक्षक सोडला, तर इतर कुठूनही ज्ञान मिळण्याची व्यवस्था नव्हती. आई-वडील शिकलेले असतील तर थोडी मदत होत असे. पण मुलांना शिकवण्याचा पूर्ण भार शाळेवर होता. एकदम ‘ढ’ विद्यार्थी शिकवणी लावायचा. यामुळे इतर मुलं चिडवायची आणि ते पालकांना परवडत सुध्दा नव्हते. पूर्वी शिक्षा करण्याचा अधिकार होता. त्यामुळे शिक्षक मुलांना चोपून काढू शकत होते आणि घरी कळलं तर घरून वेगळा मार बसायचा. त्यामुळे मनात शिक्षकांविषयी भिती होती. गुरु म्हणजे देव असतो. शिक्षक कसाही असला तरी तो व्यक्ती आपल्याला ज्ञान देतो आहे, तो गुरु आहे असे संस्कार होते. त्यामुळे गुरु विषयी अपशब्द वापरले जात नव्हते. पूर्वी शिक्षक आपल्या कामाशी प्रामाणिक होते (सगळेच नाही पण मोठ्या प्रमाणात). ज्ञानदान करणे पुण्य कर्म मानले जायचे, त्यामुळे शिक्षणाचा दर्जा चांगला होता. कितीही वर्ष शिकवत असले तरी आपल्या विद्यार्थ्यांना हे शिक्षक ओळखू शकत होते. म्हणजे हजारो मुलांना शिकवलं तरी हा माझा विद्यार्थी असा प्रत्येकाशी त्यांचा भावनिक बंध होता. मुलांच्या मनात सुद्धा शिक्षकांविषयी प्रेम आणि आदर होता.
आताची परिस्थिती काय आहे? माहितीच्या उपलब्धतेमुळे माहिती सगळीकडे नदी सारखी वाहत आहे. मोबाईल उचलला की हवी ती माहिती मिळते. मग शिक्षक कशाला हवे? शिवाय शिकवणी वर्ग आहेतच की जिथे पैसे भरून ज्ञान मिळवता येतं. शाळेत का लक्ष द्यायचं? मुलांना काही म्हणण्याची मुभा नाही. मारणे तर दुरच मुलांना शिस्त लावण्यासाठी काही बोलणे सुध्दा शिक्षकांना कठीण होऊन बसले आहे. लगेच पालक शाळेत धावून जातात. त्यामुळे नोकरी जाण्याची भिती असते. आजकाल शिक्षक सर्विस देतो, ज्ञान नाही. अभ्यासक्रम पूर्ण करणे, मुलांचे मनोरंजन करणे आणि त्यांना परिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी मदत करणे हे आजच्या शिक्षकाचे काम आहे. मी शाळेत जातो, दिलेला तास शिकवतो आणि पगार घेतो. मुलांच्या भविष्याशी माझे काही देणे घेणे नाही. पालक सरळ असे म्हणतात की, असा कसा माझा मुलगा-मुलगी नापास झाले. काय शिकवता तुम्ही? पैसे भरले आहेत तर मुलं पास झालीच पाहिजे. अशाप्रकारे पालकांची अरेरावी वाढत जात आहे.
ही झाली वरवरची कारणे, तर मुळ मुद्दा काय आहे? आजकाल ज्ञान फार कमी मुलांना हवं आहे. मुलांना फक्त पदवी प्राप्त करायची आहे. असं का? तर आपला अभ्यासक्रम फार जूना आहे, नवीन गोष्टी त्यात शिकवल्या जात नाहीत. एक इंजिनिअर जेव्हा पदवीधर होतो तेव्हा बरेचदा त्याला नोकरीवर जे काम करायचे आहे ते येतच नसते, ते शाळा, कॉलेज मध्ये शिकवले नसते. त्यासाठी कंपनीत वेगळे प्रशिक्षण देण्यात येते. मग शिक्षक जे शिकवतो त्याचा उपयोग काय? ऐकलं काय आणि नाही ऐकलं काय सारखंच. फक्त नावापुरतेच तास करायचे, शिकवणी वर्ग लावायचे आणि उत्तीर्ण झाले की काम झालं.
आजकाल मुलं शाळेत, महाविद्यालयात मौजमजा करण्यासाठी जातात. काही नावाजलेले शाळा-कॉलेज सोडली, तर इतर ठिकाणी नुसता बाजार भरला आहे. ग्रामीण भागातील सरकारी शाळेत शिकलेल्या मुलांना साधं अक्षर ज्ञानसुध्दा नसतं. ती मुलं शाळेत जातात ते विविध योजनेतून तांदूळ, जेवण मिळवण्यासाठी आणि शिक्षक येतात ते पगारासाठी. यातूनही जर एखादा शिक्षक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो, तर शाळा, कॉलेज प्रशासन त्यांनाच बाहेरचा रस्ता दाखवतात. काही ठिकाणी रेटिंग सिस्टीम असते, म्हणजे वर्ष अखेरीस मुलं आपल्या शिक्षकांबद्दल फिडबॅक देतात. ते शिक्षक चांगले आहेत की नाही वैगरे. या रेटिंगवर शिक्षकांचे वेतनवाढ, पदोन्नती या गोष्टींचे निर्णय घेण्यात येतात. मग शिक्षक का मुलांशी पंगा घेईल? शिक्षक मग मित्रांसारखाच वागेल ना.
जेव्हा दोन मुलं अभियांत्रिकीला असताना एक सिनीयर असतो, जो दरवर्षी नापास होतो आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा सोबत देते, ते त्यातही नापास होते. चार वर्षांची अभियांत्रिकीची पदवी त्यांनी आठ वर्षांत मिळवली. आज ते एका पोलीटेक्निक विद्यालयात शिक्षक आहेत. मी असं म्हणत नाही की ते शिकवू शकत नाही. ते मुलांना भरपूर इंटर्नल मार्क्स देतात. मुलांसोबत त्यांचे फोटो फेसबुकवर सतत येत असतात आणि त्यांना दरवर्षी छान रेटिंग मिळतं. अशी देवाण घेवाण चालते. बाकी शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे. शेवटी काय? दोष फक्त शिक्षकांचा नाही, तर सिस्टीमचा आहे. पण राजकारणी लोक जोपर्यंत शाळा, कॉलेज चालवतील तोपर्यंत बदलाची शक्यता आहे का? निश्चितच नाही.
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९



