स्वदया असेल तरच मोक्ष प्राप्ती शक्य…’

54

 

 

“अहिंसा परमो धर्म” हे जैन धर्मातील महत्त्वाचे तत्त्व आहे. अहिंसा आणि दया या दोन शब्दांना एकाच अर्थाने वापरला जातो परंतु दोन्हीचे अर्थ भिन्न आहे. अहिंसा म्हणजे दुसऱ्याला दुःख द्यायचे नाही, त्रास द्यायचा नाही आणि दया म्हणजे जो त्रासात, दुःखात असेल त्याला त्यातून सोडवायचे. त्यामुळेच ज्यावेळी श्रावक-श्राविका संतांना नमस्कार करतात त्यावेळी दया पालो असा आशीर्वाद देतात. स्वतःवर दया करणे म्हणजे स्वतःच्या शरीरावर नव्हे तर आत्म्याला पापापासून वाचवावे हे होय. स्वदया असेल तरच मोक्ष प्राप्ती होऊ शकते असे अत्यंत सोप्या शब्दांमध्ये प.पू. डॉ. इमितप्रभाजी यांनी आजच्या प्रवचनातू उपदेश केला. साम्यकत्त्वाचे पाच लक्षणे यावर चर्चा सुरू आहे. ते सांगताना त्यांनी राजा आणि चित्रकाराचे उदाहरण दिले. चित्रकाराच्या कलेचा आदर म्हणून त्याला राजकुमाराप्रमाणे वागणूक मिळेल परंतु येथून जाताना चित्रकार ज्या स्थितीत आला होता तसेच जायचे अशी अट राजाने टाकली होती. चित्रशाळेचे काम आटोपले चित्रकाराला एशोआराम मिळाला परंतु आपल्या परिवाराची आठवण, चिंता त्याला झाली व सर्व वैभव, एशोआराम सोडून तो चित्रकार आपल्या घरी काहीही न घेता आपल्या घरी परततो. हा मानव जन्म मिळाला त्यावेळी सोबत काहीही आणले नव्हते, मृत्यूच्यावेळी काहीही सोबत नेता येत नाही. फक्त आपले कर्म आपल्या आत्म्यासोबत असतात असे चपखल उदाहरण पटवून सांगितले गेले.
जगात धर्म सगळ्यात मूल्यवान असतो, जो धर्म रंगात बुडतो तो जन्म मरणाच्या फेऱ्यापासून वाचतो. आपल्या कर्मापेक्षा धर्म खूप मोठा आहे. धर्म हा धार्मिक आहोत असा दिखावा करण्यासाठी धर्म करून नये, तर तो कर्म निर्जरा करण्यासाठी करावा. धर्म करण्याचा सरळ, सोपा मार्ग आहे परंतु आज धर्म साधनांच्या मुबलकतेमुळे होऊ शकत नाही. साधनांसाठीच वेळ अधिक खर्च होत असतो परंतु धर्म करण्याच्या वाट्याला वेळ मिळत नाही. साधनांसाठी दिला जाणारा वेळ धर्मासाठी देणे अत्यंत आवश्यक आहे. दैनंदिन जीवन जगताना देखील सहज धर्म करता येतो. सकाळची सुरवात चहाने नव्हे तर जय ‘जिनेंद्रने’ व्हायला हवी. घरातील ज्येष्ठांना, आपल्या घराजवळ असलेल्या साधु-साध्वीजींना अभिवादन करावे, स्नान करताना नामस्मरण करता येते, शॉवरचा उपयोग करू नये, संध्याकाळी स्नान करू नये, स्नानानंतर शरीरावर महागडे क्रीम लावत असतो ते उत्पादने हिंसेने तयार झालेले असावे, जेवायला बसताना स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बोलतान, प्रवास करताना, झोपताना सर्व क्रिया करताना सावधानी बाळगावी. झोपताना दिवसभरात झालेल्या चुकांचे स्मरण करून ‘खामेमि सव्व जीवा, सव्वे जीवा खमंतु मे। क्षमा याचनेने झोपी जावे. असे छोट्या छोट्या गोष्टीतून देखील आपल्या व्यस्ततेतुन धर्माचरण करू शकतो असा विश्वास उपस्थितांमध्ये प.पू. इमितप्रभाजी म.सा. यांनी आजच्या धर्म प्रवचनातून निर्माण केला.

 

 

_(शब्दांकन – किशोर कुळकर्णी, मो. 94227 76759)