

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीला आज आठवण करण्याची गरज आहे ती प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची. कारण आज आपल्याला नव्या समाजद्रोही, धर्मद्रोह्यांशी लढायचं आहे. त्यासाठी लागणारे वैचारिक व नैतिक बळ देण्याचे सामर्थ्य प्रबोधनकारांच्या विचारांमध्ये व कार्यात आहे. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे प्रबोधनाच्या चळवळीतील आघाडीचे नाव. ज्यांनी आपल्या तडफदार वाणी बरोबर धारदार लेखणीने धर्म, जाती, संस्कृती, रुढी – परंपरा यांचे खोटे मुखवटे उतरवले. तसेच सर्व स्त्री जातीची दिशाभुल करून राजरोसपणे लुबाडणूक करणाऱ्यांच्या विरुद्ध मोहिम उघडले ते ठाकरे. प्रबोधनकारांनी भट- भिक्षुकशाही विरुद्ध बंड थोपटून समतावादी व्यवस्था निर्माण करण्याकरिता आयुष्यभर कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रीय जनतेच्या मनात मध्ययुगीन कालखंडात राजकिय आणि धार्मिक गुलामगिरीविरूध्द लढण्यासाठी स्वाभिमान निर्माण केला होता तो स्वाभिमान तसाच पेटत रहावा आणि नेहमीच अन्याया विरूध्द लढत रहावे. राजकीय आणि धार्मिक गुलामिरी विरूध्द संघटित लढा देता यावे म्हणून त्यांनी त्यांचा मुलगा बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातू शिवसेना या संघटनेची स्थापना केली. प्रबोधनकारांच्या गेल्यानंतर मात्र शिवसेनेचा उद्देश आणि कार्यपद्धती बदलली व सनातनी – मनुवाद्यांच्या मांडीवर जावून बसली. त्याच शिवसेनेची आज शक्कले पडत आहेत.
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या ज्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या अशा प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त (१७ सप्टेंबर १८८५) विनम्र अभिवादन.
अनिल भुसारी, तुमसर जि भंडारा



