“नवरात्र उत्सवाशी ‘भक्ती’, ‘शक्ती’, आणि ‘मुक्ती’ यांचा घनिष्ठ संबंध”

52

 

 

 

 

आत्मा म्हणजे आपली खरी ओळख, जो जन्म-मरणाच्या फेरात अडकलेला आहे. तो खूप काळापासून कर्म बांधत आला आहे. आपण जे करतो, बोलतो, विचार करतो त्यातून कर्म तयार होते. हे कर्म नंतर आपल्याला भोगावेच लागते. कोणताही व्यक्ती असो, संयम मार्ग अवलंबणारा साधू-संन्यासी असो वा संसारी सामान्य माणूस, त्या कुणालाही कर्म टळत नाही. कर्माचे परिणाम भोगताना संसारी व्यक्ती अभिशाप मानतात तर संयमी व्यक्ती त्याला कर्मनिर्जरा करण्याची संधी मानतात. संसारी माणूस जेव्हा दुःख अनुभवतो, तेव्हा तो “हे का माझ्याच वाट्याला?” असं म्हणतो. पण संयमी साधू तेच दुःख शांतपणे सहन करतो आणि म्हणतो, “हे माझ्या कर्मांचे फळ आहे, ते संपेल.” त्यामुळे संयमी व्यक्ती कर्म भोगताना आत्मा शुद्ध करतो. नवरात्रीचा आरंभ होत आहे त्या निमित्ताने भक्ती, शक्ती आणि मुक्ती या शब्दांची फोड करून सांगण्यात आली. पुण्य वाढविण्यासाठी लोगस्स आराधना करावी. ६ काय जीवांचे रक्षण करावे, पृथ्वी, जल यांना संरक्षीत केले तर तुम्हाला शांती लाभेल. नवरात्र उत्सव आणि ‘भक्ती’, ‘शक्ती’ आणि ‘मुक्ती’ यांचा घनिष्ठ संबंध आहे. असा मोलाचा संदेश प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी आजच्या धर्मप्रवचनात दिला.

बोलताना संयम ठेवावा, हे जैन आगमात खूप महत्त्वाचे मानले जाते. एक छोटी गोष्ट यावर प्रकाश टाकते. एक घरात सून घरातल्या व्यक्तींशी सतत कटू बोलत असे. तिच्या अतिरेकी, कठोर शब्दांनी सासू-सासऱ्यांचे मन दुखावते. जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय ते घेतात. वरच्या खोलीत त्यांनी आत्महत्या केली. आपल्या आई वडिलांना बघायला गेलेल्या मुलाने आई-वडिलांचे मृतदेह पाहिले.त्याला वाटले, आपण बायकोला थांबवू शकलो नाही, म्हणून आई-वडील गेले. त्यानेही जीव दिला. वरच्या खोलीतून कोणी खाली येत नाही म्हणून सून देखील वर गेली. तिथे तिला तीन मृतदेह दिसले. ती हादरलीच. “हे सगळं माझ्या बोलण्यामुळे झालं,” असा विचार करून तिनेही आत्महत्या केली. तिच्या पोटात बाळ होतं. फक्त कटूवाणीच्या वापरामुळे हकनाक पाच जणांचा जीव गेला. जैन धर्मात सांगितले आहे, जिनवाणीत सांगितले आहे की, मिथ्या भाषण हे पाप आहे. सम्यक वाणी म्हणजे सत्य, प्रिय, हितकारी आणि मर्यादित बोलणे. कधी मौन ठेवणे हेच योग्य असते. म्हणूनच, बोलताना विचार करा वाणीने सुखही मिळते आणि दुःखही, ती अमृत ही असते आणि विष देखील बोलत असताना नेहमी विचार करून बोलावे असे आवाहन प.पू. निलेशप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनातून केले.

 

(शब्दांकन-किशोर कुलकर्णी, मो. 94227 76759)