राजा ढाले यांचे धम्म चळवळीतले योगदान

70

 

भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात अनेक क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यात राजा ढाले हे नाव विशेषत्वाने घेण्यात येते. कारण त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांची मशाल हातात घेतली आणि धम्म चळवळीत नवा आत्मविश्वास निर्माण केला. समाजव्यवस्थेत शतकानुशतकं पसरलेल्या जात-अन्याय, विषमता आणि अमानवीय परंपरांविरुद्ध उभं राहण्याचं साहस दाखवणाऱ्या काही थोर व्यक्तींमध्ये राजा ढाले हे नाव सदैव अग्रक्रमाने घेतलं जाईल. ते केवळ एक विचारवंत, लेखक, कवी किंवा पत्रकार नव्हते; तर ते समाजमनाला हादरे देणारे, आत्मसन्मानाची जाज्वल्य जाणीव करून देणारे आणि बाबासाहेबांच्या धम्म चळवळीचे प्रखर वाहक होते.

जातिव्यवस्था ही भारतीय समाजाच्या विकासाला लागलेली गंज आहे. या व्यवस्थेविरुद्ध बोलण्याचं धाडस प्रत्येकाला होत नाही. पण राजा ढाले यांनी आपल्या लेखणीतून आणि संघर्षातून हा आवाज बुलंद केला. राजा ढाले यांनी १९७२ मध्ये स्थापन झालेल्या दलित पँथर संघटनेच्या माध्यमातून वंचित समाजाला हक्क आणि स्वाभिमानाची नवी भाषा दिली व चळवळ उभारून त्यांनी शोषित समाजात आत्मसन्मानाची ठिणगी पेटवली. तेव्हा ते तरुण होते; पण त्यांच्यातील प्रखर अस्मिता, जाज्वल्य आत्मसन्मान आणि अढळ धैर्याने संपूर्ण समाजात जागृती निर्माण केली. बाबासाहेबांनी दिलेला संदेश की “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवला.

राजा ढाले यांना नेहमीच बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणास्थान होते. आंबेडकरांनी दाखवलेला समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा मार्ग त्यांनी आयुष्यभर आपल्या कार्यातून जपला. ढाले यांच्यासाठी बुद्धांचे धम्म म्हणजे केवळ धार्मिक आचार नव्हता, तर तो सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांचा लढा होता. राजा ढाले यांचे लेखन व भाषणांतून नेहमीच धम्म मार्गाचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यांनी बुद्धांच्या करुणा, समता आणि मैत्रीच्या तत्त्वज्ञानाला सामाजिक क्रांतीचे अधिष्ठान मानले. त्यांचा ठाम विश्वास होता की खऱ्या अर्थाने मनुष्याची मुक्ती फक्त धम्माच्या मार्गानेच शक्य आहे. म्हणूनच त्यांनी आयुष्यभर जातिभेद, अंधश्रद्धा, असमानता याविरुद्ध आवाज उठवला आणि समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा झेंडा उंचावला.

पत्रकार, लेखक, विचारवंत म्हणून ढाले यांचे योगदान विलक्षण होते. त्यांनी सत्य मांडताना कधीही घाबरले नाही. त्यांच्या शब्दांत धार होती, त्यांच्या भूमिकेत ठामपणा होता. अन्यायाविरुद्ध उभं राहणं, अंधश्रद्धा फोडणं, आणि दुर्बलांच्या हक्कांसाठी झगडणं हेच त्यांचं जीवनकार्य ठरलं. राजा ढाले यांचे आयुष्य म्हणजे संघर्षाचा प्रवास होता. ते संघर्ष फक्त वैयक्तिक नव्हता, तर लाखो-करोडो दलित, शोषित, पीडितांसाठी होता. त्यांच्या अस्तित्वामुळे अनेकांना स्वतःच्या माणुसकीची किंमत कळली. अन्याय, अपमान, भेदभाव यांना न घाबरता लढणं म्हणजे काय, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं.

ढाले यांनी धम्म चळवळीला केवळ परंपरा म्हणून न जपत, तर एक जीवंत क्रांती म्हणून पुढे नेलं. त्यांनी दाखवलं की बुद्धांचा धम्म हा फक्त पूजाघरातला विषय नाही, तर तो समाज परिवर्तनाचं अधिष्ठान आहे. धम्म चळवळ ही केवळ बौद्ध धर्माची परंपरा नाही, तर ती सामाजिक परिवर्तनाची लढाई आहे.
या लढाईला दिशा देणारे राजा ढाले होते. बाबासाहेबांच्या विचारांना त्यांनी नवी धार दिली, त्यात क्रांतिकारकता आणली. त्यांच्या कार्यामुळे धम्म चळवळीत नवा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांच्या विचारांनी असंख्य तरुणांना प्रेरणा दिली आणि धम्माच्या मार्गाकडे वळवलं.

आज राजा ढाले आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार, त्यांचा संघर्ष आणि त्यांची ओजस्वी परंपरा आपल्याला सतत मार्गदर्शक ठरेल. धम्म चळवळीतला त्यांचा ठसा कायमचा अविस्मरणीय आहे. त्यांनी दाखवलेला आत्मसन्मानाचा मार्ग आणि बाबासाहेबांच्या तत्त्वांचा वारसा पुढे नेणं हीच खरी त्यांना दिलेली श्रद्धांजली ठरेल. समता, न्याय आणि धम्माचा संदेश जगभर पोहोचवणाऱ्या थोर विचारवंत राजा ढाले यांना वाढदिवसानिमीत्त मानाचा मुजरा…!

प्रवीण बागडे,नागपूर
मो.क्र. ९९२३६ २०९१९