नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या

87

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.११सप्टेंबर):-तालुक्यातील तुलाना येथील शेतकरी सुरेश कवडू धोंगे (वय ६२) यांनी सततच्या नापिकी, पावसामुळे झालेले नुकसान ,कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली.

   मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून संततधार पावसामुळे धोंगे यांच्या शेतातील कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या धोंगे कुटुंबावर आर्थिक संकट गडद झाले होते. कृषी केंद्रांमध्ये युरिया खताची टंचाई निर्माण झाल्याने शेतकामही ठप्प झाले होते. त्यामुळे धोंगे हे मानसिक तणावाखाली होते.

९ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरातील सर्व सदस्य शेतात गेले असताना, त्यांनी घरात ठेवलेले राऊंडअप कंपनीचे ‘ग्लायसिल’ हे तननाशक प्राशन केले. ही बाब लक्षात येताच शेजाऱ्यांनी त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच रात्री ११:३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुरेश कवडू धोंगे यांच्या नावावर तुलाना शिवारात पाच एकर शेती होती. त्यांनी पुरुष बचत गटाकडून ५० हजार आणि श्रीकृष्ण महिला बचत गटाकडून आणखी ५० हजार असे एकूण १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.ही घटना शेतकऱ्यांच्या व्यथा, निसर्गाच्या अवकृपेचा परिणाम आणि असलेल्या सरकारी यंत्रणेच्या अपयशाची जाणीव करून देणारी आहे. प्रशासनाने अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत व मानसिक आधार देण्याची मागणी होत आहे.