ग्रामगीता महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन उत्साहात साजरा

65

 

चिमूर : ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे जागतिक ओझोन दिन मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनंदा एस. आस्वले यांनी भूषविले होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील ईको क्लब, वनस्पतिशास्त्र विभाग आणि पर्यावरणशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. आस्वले यांनी विद्यार्थ्यांना ओझोन थराचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “ओझोन थर हा पृथ्वीवरील सजीवांसाठी सुरक्षाकवचासारखा आहे. सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करण्याचे कार्य हा थर करतो. त्यामुळे त्याचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

तसेच यावर्षीच्या जागतिक ओझोन दिनाची “विज्ञानापासून जागतिक कृतीपर्यंत” ही थीम विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. या थीमचा उद्देश स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “ओझोन थराच्या ऱ्हासाचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक संशोधन महत्त्वाचे आहे. या संशोधनातून होणारे दुष्परिणाम समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे, तसेच आंतरराष्ट्रीय करार, धोरणे, कायदे आणि तांत्रिक बदल यांसारख्या पावले उचलणे ही काळाची गरज आहे.”

या निमित्ताने महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना हरित संदेश देण्यात आला. यावेळी सर्व अध्यापकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना दृढ झाली.