

जळगाव – जैन धर्मात ‘सम्यक्त्वा’चे (सम्यक दर्शन) म्हणजे योग्य श्रद्धा, ज्ञान आणि आचरण, अर्थात व्यवहार समकितीचे पाच लक्षण कोणते असतात त्यावर धर्मप्रवचनात भाष्य करण्यात आले. त्या पाच लक्षणांमध्ये शम, संवेग, निर्वेद, अनुकंपा (‘आवेग’ हा शब्द ‘अनुकंपा’ या अर्थाने वापरला जातो) आणि आस्था हे सांगितले त्यापैकी तीन लक्षणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शम (शांती) मनातील वासना आणि कषाय (रागासारखे विकार) कमी करणे. संवेग (मोक्षाची उत्कट अभिलाषा बाळगणे), मोक्ष किंवा मुक्ती मिळवण्याची तीव्र इच्छा. हा आत्माच्या प्रगतीसाठी आवश्यक गुण आहे. निर्वेद (अलिप्तता/मोहाचा त्याग) भौतिक जगातील गोष्टींबद्दल आसक्ती आणि मोह कमी करणे. यातून अलिप्तता प्राप्त होते असे सांगून ‘समकित के ६७ बोल’ या श्रृंखलेत प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत ‘समकितची पाच लक्षणे म्हणजे मोक्षमार्गाचा प्रकाश…’ समजावू सांगितले.
सैनिकांमध्ये बल, ढगांत जल आणि मानवात धर्म असेल, तर शांती प्राप्त होते. मानवाचा खरा साथीदार धर्म आहे; ‘ना ब्रेड, ना बटर. धर्म तो है कर्म काटनेका कटर’ असे सांगताना वास्तव परिस्थिती उपस्थितांसमोर मांडताना त्या म्हणाल्या की, पूर्वी मानव धर्म हसत हसत करीत असे आणि पाप रडत रडत करत असे. आता मात्र त्यात परिवर्तन झालेले आहे. आज पाप हसतसहज केले जाते आणि नंतर त्याचे फल भोगताना कर्म रडत रडत सहन करावे लागते. शुद्ध धर्म आराधना करायची असेल तर मानवाने हुशारी धरावी; कारण बालिशपणा उपयोगाचा नसतो. आपल्याला धर्मशरण येणे आवश्यक आहे; तरच मोक्षपदावर जाता येते. धर्म आणि धार्मिक असणे या दोन्ही संकल्पना विभिन्न आहेत. हे समजून घेतल्याशिवाय आत्म्याची उन्नती साधता येत नाही. धर्मदीपक आत्म्यात प्रज्वलित झाला की अध्यात्माचा उजेड पसरतो. हाच प्रकाश मोक्ष मार्गाची वाट दाखवतो. असे मोलाचे विचार प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा. जींनी सुमधुर गीतांच्या माध्यमातून प्रवचनात मांडले.
✒️शब्दांकन:-किशोर कुळकर्णी(मो:-9422776759)



