

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड(सातारा ) : माण तालुक्यातील म्हसवड–वरकुटे मलवडी रस्त्यावर शिरताव व विरकरवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे वाहून गेले आहे. संततधार पावसामुळे पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असताना, नव्याने झालेल्या पुल व रस्त्याच्या कामात कॉन्ट्रॅक्टरनी गंभीर हलगर्जीपणा केला आहे. पुलाचे आणि रस्त्याचे काम वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरकडून झाले असून, या दोघांनीही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक चारच काढले नाहीत. परिणामी पावसाचे पाणी शेतात साचून मका व बाजरीसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
शेतकरी दिवसरात्र कष्ट करून उभे केलेले पीक पाण्याखाली गेल्याने त्यांची आर्थिक कंबर मोडली आहे. या चुकीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्या घरच्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने अशा बेपर्वा कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी संतप्त मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. कामाचा दर्जा तपासून घेणे, योग्य निचरा मार्ग काढणे ही त्यांची जबाबदारी असून त्यांनी वेळेवर लक्ष न दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे केवळ कॉन्ट्रॅक्टरवर नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
जर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर शेतकरी आंदोलनाचा इशारा देत आहेत. रस्ते रोको, ठिय्या आंदोलन अशा तीव्र स्वरूपाच्या लढ्याला शासन तयार राहावे, असा इशारा स्थानिक शेतकरी संघटनांनी दिला आहे.



