

पुणे:- बहुजन, विशेषतः अनुसूचित जाती व वंचित घटकांच्या स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्वावर गदा आणणाऱ्या पुणे कराराविरोधात बहुजन समाज पक्षाच्या वतीने भव्य ‘पुणे करार धिक्कार परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता येरवडा येथील ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात’ होणारी ही परिषद बहुजनांच्या राजकीय-सामाजिक चळवळीला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केला.
जाहीर सभेतून माजी राज्यसभा खासदार, महाराष्ट्राचे केंद्रीय प्रभारी राजारामजी, प्रदेशाध्यक्ष अॅड.सुनिल डोंगरे यावेळी मार्गदर्शन करतील. प्रदेश प्रभारी रामचंद्र जाधव, पुणे झोन प्रभारी अॅड.संजीव सदाफुले, अप्पासाहेब लोकरे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सहा जिल्हाध्यक्ष सर्वश्री अशोक गायकवाड (पुणे), बबलू गायकवाड (सोलापूर), लहरीदास कांबळे (सांगली), रविंद्र कांबळे (कोल्हापूर), आनंद थोरोडे (सातारा), सुरेश कांबळे (अहमदनगर) प्रामुख्याने उपस्थित राहणार असून पश्चिम महाराष्ट्र झोनची जिल्हा, विधानसभा, सेक्टर कमिटीची आढावा बैठक देखील घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ.चलवादी यांनी दिली.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३०, १९३१, १९३२ या वर्षी गोलमेज परिषद, लंडन येथे इंग्रजांशी संघर्ष आणि बौद्धिक युक्तिवाद करून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ मंजूर करून घेतले होते. कायदेमंडळ, विधीमंडळात दलित समाजाच्या हिताचे कार्य करणारे, खरे प्रतिनिधी स्वतंत्र मतदार संघामुळे त्यामुळे निवडून जाणारे होते. पंरतु, कॉंग्रेस व गांधींना अस्पृशांना मिळालेला स्वतंत्र मतदार संघाचा अधिकार मान्य नव्हता. यातून गांधींनी येरवडा कारागृहात आमरण उपोषण सुरू करीत डॉ.बाबासाहेबांवर दबाब टाकला.
कॉंग्रेसच्या मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी दलितांवर अत्याचार सुरू केले. अशात जड अंत:करणाने डॉ.बाबासाहेबांना दलितांच्या स्वतंत्र मतदार संघांवर गदा आणणारा पुणे करार करावा लागला. या करारामुळे बहुजन समाजाचे राजकीय बळकटीकरण खुंटले. या ऐतिहासिक अन्यायाविरोधात बहुजन समाजाने आता पुन्हा सजग व्हावे, हा संदेश या परिषदेच्या माध्यमातून दिला जाईल. बहुजनांच्या राजकीय ऐक्याचा नवा टप्पा परिषदेतून सुरू होईल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.



