राजुरा येथे कृषी विभागाची बैठक : ‘पोखरा’ व ‘कृषी समृद्धी’ योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

60

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा : राजुरा येथे कृषी विभागाच्या कामकाजाचा व विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच आमदार देवराव भोंगळे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत विशेषतः ‘पोखरा’ (PoCRA – नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना) आणि कृषी समृद्धी योजना यांच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांचा अहवाल सादर केला. शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, उद्दिष्टपूर्तीतील अडचणी तसेच त्यावर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली. शासनाच्या या योजनांचा मूळ उद्देश शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा असल्याचे नमूद करत, लाभ प्रत्यक्षात तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी अधिकारी क्षेत्रीय पातळीवर अधिक दौरे करावेत, असे मार्गदर्शन या बैठकीत आमदार देवराव दादा भोंगळे यांनी केले.

तसेच, योजनांची माहिती देणाऱ्या कार्यशाळा आयोजित करून पारदर्शकता आणावी आणि योजनांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन द्यावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.या

बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास जाधव, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, तालुका कृषी अधिकारी विनायक पायघन, गोविंद ठाकूर, सौ. गावडे, सचिन पानसरे, तसेच विधानसभेतील चारही तालुक्यांतील सहाय्यक कृषी अधिकारी व कृषी सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.