कबीरांच्या काव्यावर बुद्धाचा प्रभाव

79

कबीर हे एक चौदाव्या शतकातील महान भारतीय संत कवी आणि समाजसुधारक होऊन गेले. त्यांच्या साहित्यावर बुद्धांच्या विचारांचा सखोल प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. तथागत बुद्ध हे कबीरांच्या आधी साधारणतः एक हजार वर्षा पूर्वी होऊन गेले असले तरी कबीरांच्या विचार श्रेणीत, तत्त्वज्ञानात आणि समाज सुधारणेच्या उद्दिष्टांमध्ये अनेक समान तत्व दिसून येतात. कबीरांच्या काव्यात बुद्धांच्या सिद्धांतांचे प्रतिबिंब स्पष्टपणे उमटलेले दिसते. विशेषतः त्यांची वैज्ञानिक, तार्किक, बौध्दिक विचारसरणी, कर्मकांडांचा त्याग, अहिंसा, नैतिक आचरण, सदाचार व सर्वोपरि बहुजन हित या बाबींवर कटाक्षाणे भाष्य केलेले दिसून येते. बुद्धांनी आपल्या शिष्यांना अंधश्रद्धा आणि कोणत्याही ऐकीव गोष्टींवर डोळे झाकून विश्वास न ठेवण्याचा उपदेश दिला होता. कालाम सूत्र मध्ये त्यांनी सांगितले होते की, कोणतीही गोष्ट ती फक्त यामुळे म्हणून स्वीकारू नका की, कारण ती एखाद्या धर्मग्रंथात लिहिली आहे किंवा एखाद्या आदरणीय गुरूने सांगितली आहे. त्याऐवजी आपल्या विवेक आणि अनुभवाच्या कसोटीवर ती तपासून बघा आणि नंतर स्वीकार करा. कबीरांच्या दोह्यांमध्येही हेच विचार आढळून येतात:

“मैं कहता हूँ आखिन देखि, 

तू कहता कागज़ की लेखि।” 

येथे कबीर धर्मग्रंथांमध्ये लिहिलेल्या गोष्टींपेक्षा आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या, म्हणजेच अनुभवजन्य सत्याला प्राधान्य देतात. हा दृष्टिकोन बुद्धांच्या तार्किक आणि अनुभव-आधारित विचारांशी जुळतो. पंचशील आणि नैतिक आचरण बुद्धांचे पंचशील सिद्धांतात जे मानवी जीवनाचे नैतिक आचरणाचे जे पाच प्रमुख नियम आहेत ते कबीरांच्या काव्या मध्येही प्रखरतेने दिसून येतात.

१.प्राणी हिंसेपासून दूर राहणे(अहिंसा): बुद्धांनी सर्व प्राणीमात्रांवर दया करण्याचा उपदेश दिला. कबीरांनीही आपल्या काव्यात मांसाहार आणि पशुबळीचा तीव्र निषेध केला आहे.

“बकरी पाती खात है, ताकि काढी खाल। 

जो नर बकरी खात है, तिनका कौन हवाल।।” येथे संत कबीर स्पष्टपणे पशुहिंसेचा विरोध आणि मांसाहार करणाऱ्यांना इशारा देतात की, जी बकरी झाड पाला खाते तीची जीवंत पणी चामडी काढली जाते आणि जी माणसे बकरी खातात त्यांची काय अवस्था असेल? असा खडा सवाल ते समाजाला करतात.

२.चोरी न करणे: कबीरांनी व्यक्तीच्या मनातील सत्य आणि त्याच्या कर्मांमधील संबंधावर भर दिला. त्यांचे मत होते की, व्यक्तीच्या बोलण्यावरूनच त्याच्या चारित्र्याचे ज्ञान होते. तो कशा स्वभावाचा व्यक्ति आहे? हे स्पष्ट पणे कळते. मग तो सज्जन असो वा चोर.

“बोलत ही पहिचानिये, साहु चोर को घाट। 

अंतर की करनी सबै, निकसै मुख की बांट।।”

३.व्यभिचारापासून दूर राहणे: बुद्धांनी चारित्र्याच्या शुद्धतेवर आणि ब्रह्माचरणावर भर दिला आहे. कबीरांनीही काम, क्रोध आणि लोभ यांना मानवी जीवनासाठी सर्वात मोठे धोके मानले आहेत. त्यांनी धन आणि कामिनी(स्त्री) यांना मोह-मायेचा फास मानले.

“एक कनक अरु कामीनी, जग में दोऊ फंदा। ता पे जो न बंधवाई, ताका मैं बंदा।।”

अर्थात कबीर असे सांगतात की, खरा संत किंवा त्यागी पुरुष तोच आहे जो धन आणि वासनेच्या व मोहापासून अलिप्त राहतो. आणि अशा व्यक्तिचा मी शिष्य बनने अधिक पसंद करेल.

४.खोटे न बोलणे: कबीरांनी वाणीच्या शुद्धतेवर आणि सत्य बोलण्यावर खूप भर दिला. त्यांचे मत होते की, शब्दांमध्ये इतकी शक्ती असावी की ते ऐकणाऱ्याला आणि बोलणाऱ्याला दोघांनाही मन:शांती आणि शीतलता प्रदान करेल.

 “ऐसी बानी बोलिये, मन का आपा खोय। 

औरन को शीतल करें, आपहु शीतल होय।।”

 तसेच ते याहीपुढे जाऊन असे सांगतात की,

“ऐसींं बानी बोलिए, कोई न बोले झूठ।

ऐसी जगह बैठिए, कोई न बोले उठ।।” 

“जैसी मुखतै निकले, तैसी चाले नाही।

मानुख नहीं तै स्वान गति, बांधे जमपुरी जाई।।”

हा विचार बुद्धांच्या सत्य वचन व सत्य आचरणाशी, सिद्धांताशी थेट जोडला गेलेला आहे. माणसाचे बोलते आणि आचरण या मध्ये भेद असता कामा नये.

५.मादक पदार्थांचे सेवन न करणे: बुद्धांनी मादक पदार्थांचे सेवनाने माणसाच्या मनाची स्थिरता आणि विवेक नष्ट होते असे मानले आहे. कबीरांनीही हाच विचार स्वीकारला आणि भांग, तंबाखू, दारू यांसारख्या नशिले पदार्थ सेवनाचे व्यसनांवर कठोर टीका केली.

“भाँग, तम्बाकू, धतूरा, आफूँ और शराब। 

कौन करेगा बंदगी, ये तो हुए खराब।।” 

अर्थात कबीर असे म्हणाले की, वरील सर्व मादक द्रव्ये सेवनाने माणसाची विवेक बुद्धी आणि वैचारिक क्षमता नष्ट करतात. म्हणूच माणूस दुष्कर्म व आचरण भ्रष्ट होतो. तदवतच कबीरांनी मूर्ति पूजा, जाती भेद यावरही कठोर प्रहार केले आहेत.

“पत्थर पूजे हरि मिले तो मैं पूजूं पहाड़।

तातै यह चाकी भली, पीस खाय संसार।।”

ते असे म्हणतात की, दगडाच्या मूर्तिची पूजा केल्याने ईश्वर भेटला असता तर मी पहाडाची पूजा केली असती. परंतु वास्तवात असे घडताना दिसत नाही. कारण असे घडले असते तर ज्या दगडापासून बनवलेल्या चक्कीतून दळलेले पीठ संपूर्ण संसार खातो तरीही त्यांना ईश्वराचे दर्शन होत नाही. 

“जाति-पाति पूछे नहीं कोई।

न हरि को भजै सो हरि का होई।।

जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान।

मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान।।”

जतीभेदा विषयी कबीर म्हणतात की, जात ही माणसासाठी तलवारीच्या म्याना सारखी असते. तलवारीच्या म्यानाला महत्व नसून तीच्या धारेला महत्व असते. तसेच मानवी जीवनात जातीचे कहते. माणसा विषयी विचारायचेच असेल तर त्याची जात महत्वाची नसून तो कोणत्या विचाराचा आहे. त्याच्याकडे किती ज्ञान आहे. हे पाहिले पाहिजे. कबीरांनी साधु या शब्दाचा प्रयोग ज्ञानी, संत, विद्वान, शिक्षित व्यक्ती या अर्थाने केला आहे. ढोंग, पाखंड आणि कर्मकांड यावरही कबीरांनी सडकुन टीका केली आहे. ते म्हतात की,

“कुंकुम तीलक लगाया, लंबी जटा बढाता है।

अंतर तेरे कुफर कटारी, यूं नहीं साहिब मिलता है।।

अर्थात कुंकवाचा टीळा, अंगाला भस्म लावणे, भगवे वस्त्र धारण करने, लांब लांब जटा वाढवणे यामुळे ईश्वर भेटत नाही. हा केवळ दिखावा आहे. ढोंग आहे. पाखंड आहे. खर्या अर्थाने ईश्वर तेंव्हाच भेटेल जेंव्हा तुमचे अंतर्मन शुद्ध असेल, मन जर षड विकाराने भरलेले असेल तर ईश्वराचे दर्शन होने कदापि शक्य नाही. म्हणजे ते मणुष्याच्या आचरण शुद्धतेला महत्व देताना दिसून येते. कबीरांचे ईश्वर हे चराचर सृष्टिच्या कणकणात व प्रत्येक प्राणीमात्राच्या मनमनात वास करते. आणि त्यांची सेवा बीच ईश्वर सेवा आहे असे ते माणतात. उदाहरणार्थ,

“ना मैं देवल ना मैं मस्जिद, ना काबे कैलास में।

मोको कहां ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में।।

ना ही कोई क्रिया कर्म में, नहीं राग बैराग में।

शोधि होय तो तुरतै मिलही, पलभर की तलाश में।।”

निष्कर्ष:

सारांश रूपाने निश्चितपणे असे सांगता येईल की, कबीरांच्या काव्यावर बुद्धांचा अत्यंत गहरा प्रभाव हा केवळ योगायोग नाही तर तो दोन्ही महान विभुतींच्या वैचारिक समानतेचे प्रतीक तर आहेच. असेही म्हणाता येईल की, बुध्दांचा वारसा पुढे एक हजार वर्षानंतर संत कबीरांनी चालविला. या महामानवांनी तत्कालीन समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा, धार्मिक कर्मकांड, आडंबर, ढोंग, पाखंड आणि चुकीच्या रूढि परंपरा इत्यादिंचा विरोध केला. त्यावरती कठोर प्रहार कले. शांतिप्रिय, सौहार्दपूर्ण समाज निर्मितीसाठी नैतिक मूल्यांवर, तार्ककतेवर, अहिंसेवर आणि मानवी कल्याणावर भर दिला असेच म्हणता येते. कबीरांच्या दोह्यांमध्ये आणि पदांमध्ये बुद्धांच्या सिद्धांतांचे खोलवर प्रतिध्वनी ऐकू येतात ज्यामुळे हे स्पष्ट होते की कबीरांनी बुद्धांच्या विचारांना त्यांच्या काळाच्या सामाजिक संदर्भात स्वीकारून एका नव्याने क्रांतीपर्वाची पुनःर्बांधनी केली.  

✒️प्रा.डॉ.एम.डी.इंगोले(हिंदी विभाग प्रमुख व संशोधन मार्गदर्शक)

श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गंगाखेड जि.परभणी

ई-मेल पता – ingolemunjaji@gmail.com

मोबाइल नं.9970721935