भावनिक नात्याचं प्रतिक : करवा चौथ

38

 ‘करवा’ म्हणजे मातीचा कलश किंवा भांडे आणि ‘चौथ’ म्हणजे चतुर्थी. कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षाची चतुर्थी या दिवशी ‘करवा चौथ’ साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया सूर्योदयापासून ते चंद्रदर्शनापर्यंत उपवास धरून पतीच्या दीर्घायुष्याची व सुखी वैवाहिक जीवनाची प्रार्थना करतात. भारत हा सण-उत्सवांचा देश आहे. प्रत्येक प्रांतातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा येथे जपल्या जातात. त्यातही स्त्रीच्या सौभाग्यासाठी व पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा होणारा ‘करवा चौथ हा व्रतप्रधान सण विशेष महत्त्वाचा मानला जातो. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश या भागात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आता त्याचा प्रभाव महाराष्ट्रासह इतर राज्यांतही दिसून येतो. करवा चौथ ही केवळ धार्मिक परंपरा नसून पती-पत्नीतील भावनिक नात्याचे प्रतीक आहे. या सणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात श्रद्धा, संयम व कुटुंबाबद्दलची निष्ठा दृढ होते. स्त्रियांची सजावट, मेहंदी, नृत्य, गाणी या माध्यमातून आनंद व उत्साह निर्माण होतो. आजच्या काळात नवरा-बायको दोघेही एकमेकांसाठी उपवास करतात ही एक नवी सकारात्मक परंपरा उदयाला येत असुन या सणाला सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आधुनिक काळातील बदल म्हणजे पूर्वी करवा चौथ हा सण फक्त पारंपरिक पद्धतीने ग्रामीण व शहरी घरांमध्ये साजरा होत असे. आता मात्र चित्रपट, मालिका, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे या सणाची लोकप्रियता संपूर्ण देशभर वाढली आहे. शहरी भागात महिलांसाठी खास करवा चौथ समारंभ, फॅशन शो, मेहंदी स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. करवा चौथ हा सण स्त्रीच्या श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाचा प्रतीक आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया करीत असलेले हे व्रत केवळ धार्मिक नसून कौटुंबिक ऐक्य व वैवाहिक जीवनातील बंध दृढ करणारा आहे. बदलत्या काळानुसार या सणाच्या पद्धतीत फेरबदल झाले असले तरी त्यामागचा मुख्य उद्देश आजही तितकाच जिवंत आहे, पती-पत्नीतील प्रेम आणि कुटुंबाचे सुख-समाधान.

         करवा चौथशी निगडित अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक कथा सती सावित्रीची आहे. सावित्रीने आपल्या तपश्चर्येने मृत्यूदेव यमराजालाही पती सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले होते. त्यामुळे या व्रताचा संबंध पतीच्या आयुष्याशी जोडला गेला आहे. दुसरी कथा पांडवांच्या काळाशी निगडित आहे. म्हणे, द्रौपदीनेही पती अर्जुनाच्या कल्याणासाठी करवा चौथचे व्रत केले होते. त्यामुळे पतीच्या सुरक्षिततेसाठी व सौख्यासाठी हे व्रत स्त्रिया आचरणात आणतात. करवा चौथ व्रताची पद्धत म्हणजे सकाळची सुरुवात विवाहित स्त्री सूर्योदयापूर्वी ‘सर्गी’नावाचे भोजन करते. हे भोजन प्रामुख्याने सासरच्या मंडळींकडून दिले जाते. तसेच, दिवसभर अन्न व पाणी न घेता उपवास केला जातो. दिवसभर स्त्रिया सजतात, मेहंदी लावतात, नटतात. संध्याकाळचा पूजाविधीच्या वेळी करव्यामध्ये पाणी, धान्य भरले जाते. सखी-सोबती स्त्रिया एकत्र बसून पूजा करतात व आख्यायिका ऐकतात आणि शेवटी चंद्रदर्शन रात्री चंद्र उगवल्यावर त्याला चलणी अथवा जाळीदार वस्त्रातून पाहिले जाते. त्यानंतर पतीला त्याच चलणीतून पाहून पतीच्या हातून पाणी व अन्न घेऊन उपवास सोडला जातो.

          करवा चौथ म्हटले की डोळ्यासमोर येते ते सुहागिन बायका, चंद्राला चलनीतून पाहणारी दृश्ये आणि पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना. पण आजच्या आधुनिक काळात हा सण फक्त पती-पत्नीपुरता मर्यादित राहिलेला नाही. आता तरुण प्रेमिके-प्रेमिकाही करवा चौथ साजरा करून आपल्या नात्यातील बंध अधिक घट्ट करतात. प्रेमिकांसाठी करवा चौथ म्हणजे प्रेमाचे व्रत. दिवसभर न खाता-पिता एकमेकांसाठी उपवास करणे ही केवळ परंपरा नाही, तर एकमेकांसाठी असलेली काळजी आणि निष्ठा व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग आहे. मुलगी आपल्या प्रियकराच्या यशासाठी, तर मुलगा आपल्या प्रेयसीच्या सुखासाठी प्रार्थना करतो. आज सोशल मीडियाच्या युगात जोडपी हा दिवस खास बनवतात. गिफ्ट्स देऊन, चंद्र पाहून एकत्र व्रत सोडून आणि आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याच्या वचनांनी. करवा चौथ प्रेमिकांसाठी केवळ धार्मिक विधी नसून, तो प्रेम, विश्वास आणि एकत्रित आयुष्याची आशा जपणारा सण बनला आहे. काही पारंपरिक विचारांचे लोक याकडे वेगळ्या नजरेने पाहतात, कारण करवा चौथ मूळतः वैवाहिक बंधनासाठी होता. मात्र बदलत्या काळात हा सण नात्यांमध्ये विश्वास, समर्पण आणि प्रेम वाढवणारा म्हणून तरुण पिढीत वेगळ्या अंगाने स्वीकारला जातो. आजच्या पिढीसाठी करवा चौथ हा फक्त पती-पत्नीपुरता मर्यादित न राहता प्रेमिक-प्रेमिकांच्या नात्यातील भावनिक जवळीक वाढवणारा सण ठरत आहे. प्रेमात असलेली जोडपी हा दिवस आपापल्या पद्धतीने साजरा करून नात्यातील प्रेम, आदर आणि बांधिलकी अधिक दृढ करतात.

           एकेकाळी एका नवविवाहित महिलेने आपल्या माहेरी असतांना हे व्रत केले. ती सुस्वरूप अशी युवती होती. तिने कठोरपणे आपला उपवास पालन केला. तिच्या तपाने तिला दीर्घायुष्य मिळाले. भावांनी जवळच्या डोंगरावर अग्नी प्रज्वलित केला आणि तिला सांगितले की चंद्र उगवला आहे. व्रताची समाप्ती करताना चंद्राचे दर्शन घेण्यासाठी ती तिथे गेली पण तिला लक्षात आले की भावांनी आपल्याला फसविले आहे. तिचे व्रत मोडल्याने तिच्या पतीच्या निधनाची बातमी तिला समजली. ती बातमी कळताच ती आपल्या पतीच्या घरी निघाली. वाटेत तिला शिव पार्वती भेटले आणि त्यांनी तिला असे का घडले असावे हे कथन केले. पार्वतीने तिला आपल्या करंगळीच्या टोकातून थोडे रक्त दिले आणि आपल्या पतीच्या मुखावर शिंपडण्यास सांगितले. भविष्यकाळात तिने अगदी कठोरपणे हे व्रत पाळण्याचा सल्लाही देवीने तिला दिला. सासरी पोहोचल्यावर तिने पार्वतीने दिलेले रक्त पतीच्या मुखावर शिंपडले आणि तो पुनरूज्जीवित झाला. त्यानंतर या महिलेने निष्ठेने करवा चौथ व्रत पालन केले आणि तिला सुख समृद्धी प्राप्त झाली अशी या व्रतामागील आख्यायिका आहे.

         करवा चौथ हे हिंदू व्रत आहे. हे व्रत दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश या प्रांतात केले जाते. आश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी पूर्ण दिवस उपवास करतात. संध्याकाळी चंद्र उगवल्यावर चाळणीतून प्रथम चंद्राचे दर्शन व नंतर पतीचा चेहरा पाहतात. क्वचित अविवाहित स्त्रियाही आपल्या इच्छित पतीसाठी हे व्रत करतात. सनातन धर्माच्या लोकांसाठी करवा चौथ व्रताचे विशेष महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीधार्युष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात. तथापि हा उपवास खूप कठीण आहे, कारण या उपवासात अन्नाबरोबरच पाणी पिण्यासही मनाई आहे, म्हणजेच हा निर्जल उपवास ठेवण्याचा नियम आहे. संध्याकाळी चंद्र देवाला जल अर्पण केल्यावरच हे वत मोडले जाते. करवा चौथ व्रताचे अनेक महत्त्वाचे नियम आहेत, त्यांचे पालन न केल्यास स्त्रियांना त्यांच्या पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.

          यादिवशी गणपती आणि करवा देवी व्यतिरिक्त चंद्र देवाची पूजा करणे देखील महत्त्वाचे आहे. चंद्र देव हे वय, सुख, समृद्धी आणि शांतीसाठी जबाबदार ग्रह मानला जातो. करवा चौथच्या दिवशी चंद्र देवाची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते. याशिवाय पतीचे वय वाढण्याची शक्यता ही वाढते. देशातील अनेक राज्यांमध्ये करवा चौथ चा उपवास करक चतुर्थी व्रत म्हणूनही ओळखला जातो, करवा चौथ व्रताचे महत्वाचे नियम करवा चौथ उपवास सूर्योदयापूर्वी सुरू होतो आणि चंद्र उगवल्यानंतर समाप्त होतो. चंद्र देवाचे दर्शन घेऊनच हे व्रत मोडावे. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी शिव परिवाराची पूजा करताना स्त्रीचे तोंड पूर्वेकडे असावे. या दिशेला तोंड करून पूजा करणे शुभ असते.

         पारंपरिकदृष्ट्या करवा चौथ हा सण विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्याच्या कामनेसाठी साजरा करतात. परंतु आधुनिक काळात, विशेषतः तरुणाईमध्ये, हा सण प्रेमिक-प्रेमिकांमध्ये देखील लोकप्रिय होत आहे. पूर्वी करवा चौथ हा फक्त सौभाग्यवती स्त्रियांचा सण मानला जात असे. पण आता प्रेमात असलेल्या जोडपीदेखील एकमेकांप्रती निष्ठा, प्रेम आणि बांधिलकी दाखवण्यासाठी हा दिवस साजरा करतात. या दिवशी अनेक तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसाठी दिवसभर उपवास धरतात आणि त्याच्यासाठी सुख-समृद्धी व यशाची प्रार्थना करतात. तसेच, काही वेळा तरुण मुलंही आपल्या प्रेयसीसाठी उपवास करतात, जेणेकरून नात्यात समानतेचा आणि परस्पर प्रेमाचा संदेश जाईल.

         आजकाल सोशल मीडियाच्या प्रभावामुळे करवा चौथ इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲपवर प्रेमिके-प्रेमिके करवा चौथच्या शुभेच्छा देतात, फोटो शेअर करतात. एकत्र उपवास – काही प्रेमिके उपवास एकत्र धरतात आणि चंद्र पाहिल्यावर नाते अधिक दृढ करण्याची प्रतिज्ञा करतात. बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड या दिवशी एकमेकांना खास भेटवस्तू व सरप्राईजेस देतात, ज्यामुळे हा दिवस संस्मरणीय ठरतो. पारंपरिक विधींची शाब्दिक नक्कल केली जाते, पण त्यामागे खरी भावना असते ती म्हणजे रोमँटिक अँगल एकमेकांवरील प्रेम आणि काळजी. सर्वांना करवा चौथ च्या हार्दिक शुभेच्छा.

✒️प्रविण बागडे(नागपूर)मो:-9923620919