

मान्यवर कांशीरामजी हे भारतीय राजकारणातील एक अनमोल रत्न आणि बहुजन समाज पक्षाचे (BSP) संस्थापक होते. त्यांनी बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक वर्गाला राजकीय दृष्ट्या संघटित केले आणि त्यांना सत्तेत आणण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
सन १९३४ सालातील मार्च मासाच्या १५ तारखेला जन्मलेल्या कांशीरामजींचे नाव त्यांच्या स्वकर्तृत्वाने बहुजन समाजातील बहुपत समाजरत्न,बहुजन नायक म्हणून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेले.
पंजाबमधील रोपड जिल्ह्यातील खवासपूर या गावात त्यांचा जन्म एका शिख कुटुंबात झाला. वडील हरिसिंग आणि आई बिशन कौर यांच्या सुसंस्कारात त्यांचे बालपण गेले.
मा. कांशिरामजी यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर मा.कांशीराम हे १९५८ मध्ये पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या कार्यालयात (DRDO) संशोधक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी, व्यवस्थापनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंतीच्या सुट्ट्या रद्द करून टिळक जयंतीची सुट्टी आणि दिवाळीची एक अतिरिक्त सुट्टी जाहीर केली. या निर्णयाविरोधात राजस्थानचे अनुसूचित जातीचे असलेले श्री. दीना भाना यांनी निषेध केला. त्यांच्या या निषेधामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. दीना भाना यांच्यावरील या अन्यायकारक आणि जातीयवादी कृतीमुळे मा. कांशीरामजी यांच्यात एक नवी जागृती झाली.
कांशीरामजींनी दीना भाना यांच्यासाठी कायदेशीर लढाई लढण्यास सुरुवात केली आणि त्यांना मदत केली. या लढ्यात डी. के. खापर्डे यांनीही मदत केली. व्यवस्थापनाने या कारणामुळे कांशीराम यांनाही निलंबित केले आणि डी. के. खापर्डे यांची बदली केली. डी. के. खापर्डे यांनी कांशीराम यांना बाबासाहेबांचे ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ (जाती विच्छेद) हे पुस्तक दिले. कांशीराम यांनी ते पुस्तक एका रात्रीत अनेक वेळा वाचले, ज्यामुळे त्यांच्या विचारांना एक नवी दिशा मिळाली. बाबासाहेबांचे मिशन पुढे नेण्यासाठी’बामसेफ’ (BAMCEF) या संघटनेची स्थापना केली. दीना भाना हे बामसेफच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. पुण्यात नोकरी करत असताना त्यांना पहिल्यांदा जातीय भेदभावाचा अनुभव आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सुट्टी रद्द करण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. या घटनेमुळे आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वतःचे जीवन सामाजिक कार्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेऊन सामाजिक कार्य सुरू केले. सन १९६४ मध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होण्यासाठी आजीवन अविवाहित राहण्याचा निश्चय केला. त्यांनी कार्याला गती देण्यासाठी विविध संघटनांची स्थापना केली. बहुजन समाजाला जागृत करून त्यांना संघटित करण्यासाठी सर्वप्रथम बामसेफ (BAMCEF – Backward and Minority Communities Employees Federation) या संघटनेची स्थापना दि.६ डिसेंबर १९७८ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केली. बामसेफ ही संघटना सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांमधील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना एकत्र आणून त्यांना समाजाच्या उत्थानासाठी आर्थिक व बौद्धिक मदत करण्यास प्रेरित करण्यासाठी स्थापन केली होती. ही सुरुवातीला एक गैर-राजकीय संघटना होती.
डी.एस-४ (DS4 – Dalit Shoshit Samaj Sangharsh Samiti) ची स्थापना सन १९८१ मध्ये मा. कांशिरामजींनी केली. बामसेफच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या बहुजन समाजाला राजकीयदृष्ट्या सक्रीय करण्यासाठी आणि रस्त्यावर उतरून सामाजिक संघर्ष हा या संघटनेचा उद्देश होता.
दि.१४ एप्रिल १९८४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी मा. काशीरामजी यांनी बहुजन समाज पक्षाची ( BSP -Bahujan Samaj Party) स्थापना केली.’दलित’ आणि ‘बहुजन’ समाजाला सत्ताधारी बनवणे, हे या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट होते. “जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी”हे त्यांचे घोषवाक्य खूप जनप्रिय झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्ता ही सर्व कुलुपांची चाबी आहे. या सिद्धांतावर कांशीरामजी यांचा पूर्ण विश्वास होता. त्यांनी उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या राज्यात दलित आणि मागासवर्गीयांचे प्रभावी राजकीय एकत्रीकरण केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशच्या राजकारणात खूप मोठे स्थान प्राप्त केले होते आणि त्यांच्या वैचारिक शिष्या मायावती यांना अनेक वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनविले होते. ते स्वतः १९९१ व १९९६ या दोन वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी आयुष्यात कधीही आरक्षित जागेवरून निवडणूक लढवली नाही, हे त्यांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होते. २००१ मध्ये त्यांनी सार्वजनिकरित्या मायावती यांची आपली राजकीय वारसदार म्हणून घोषणा केली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन बहुजन समाजाच्या उत्थानासाठी समर्पित केले. कोणतीही मालमत्ता न ठेवता, एका सच्चा सामाजिक कार्यकर्त्याप्रमाणे ते जीवन जगले आणि त्यांनी दलित-बहुजन राजकारणाला एक नवी दिशा दिली.
मान्यवर कांशीराम यांचे दीर्घ आजाराने दि.९ ऑक्टोबर २००६ रोजी नवी दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
कांशीराम यांनी भारतीय राजकारणात बहुजन समाजाला एक नवी ओळख दिली. आत्मसन्मान दिला आणि राजकीय शक्ती प्रदान
केली. म्हणूनच ते भारतामध्ये बहुजन समाजरत्न आणि ‘बहुजन नायक’ म्हणून ओळखले जातात. बहुजन समाजाचे उद्धारकर्ते, बहुजन समाजरत्न मान्यवर कांशीराम साहेबांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
✒️प्रा.अरुण बाबाराव बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९



