विनय ते क्षुल्लक निर्ग्रंथ: आत्मोत्कर्षासाठीचे सहा सोपान

28

उत्तराध्ययन सूत्रातील विनय, परिषह विजय, चौरंगीय, असंस्कृत, अकाम मरण आणि क्षुल्लक निर्ग्रंथ ह्या सहा अध्ययनांचे वाचन व त्याचा अर्थ उदाहरणांसह आजच्या प्रवचनात सांगण्यात आला. वरील सहा ही बाबी साधकाच्या आत्मोत्कर्षची पायरी आहेत अर्थात विनय ते क्षुल्लक निर्ग्रंथ: आत्मोत्कर्षासाठीचे सहा सोपान आहेत असे प.पू. डॉ. हेमप्रभाजी ‘हिमांशूजी’ म.सा. आणि प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी सांगितले.

काल विनय गुणाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली होती. परिषह याबाबत स्पष्टीकरण करताना त्या म्हणाल्या की, परिषह हीच संयमाची खरी कसोटी आहे. उत्तराध्ययन सूत्र म्हणते, “परिसहं जयं मोणि, धीरं चित्तं न कंम्पय” जो साधू परिषह जिंकतो त्याचे चित्त स्थिर राहते. उष्णता, भूक, तहान, निंदा, अपमान अशा २२ परिषहांचा सामना करणारा साधक खरा विजयी ठरतो. चतुरंगीय साधना म्हणजे ज्ञान, दर्शन, चारित्र आणि तप या चार अंगांचा संगम, जसा दसवैकालिक सूत्रात सांगितले आहे. ‘असंस्कृत’ म्हणजे बाह्य आडंबराशिवाय शुद्ध मनाने जगणे. आचारांग सूत्रात म्हटले आहे, “जो निर्ग्रंथो, जो निरालंकारो,” म्हणजे जो साधू अलंकारांपासून मुक्त आहे तोच असंस्कृत. पुढे ‘सकाल मरण’ म्हणजे सजगतेने, स्मृतिशीलपणे देहत्याग करणे, जसे उत्तराध्ययन सूत्रात “सज्जग्गो मुणि मरइ” असे वर्णन येते.

शेवटी ‘शुल्लक निर्ग्रंथ’ म्हणजे वैराग्याचा प्रारंभिक टप्पा, जिथे साधक संसारबंधनातून मुक्त होतो. हे स्पष्ट करताना सांगितले की ही तत्त्वे केवळ ग्रंथात नव्हे, तर आचरणात आली की माणूस ‘मुनि’ बनतो आणि हाच जैन आगमांचा खरा संदेश आहे. प.पू. महाराज साहेबांच्या आवाहनावरून उत्तराध्यायन सूत्रच्या या ३६ गाथांचे श्रावक-श्राविकांनी पाठांतर करू ते प्रवचन स्थळी सादर करण्यास सांगितले होते. जळगाव येथील जिनेश्वरी ग्रुपच्या महिला सदस्यांनी सहा गाथांचे अत्यंत चांगल्या पद्धतीने सादरीकरण केले. त्यात नयना भंसाली, संगिता कुचेरिया, हितेशी संघवी आणि मधु कोटेचा यांनी केले. याच समवेत आचार्य १००८ प.पू. नानालालजी म.सा. २६ वी पुण्यतिथी तसेच (नानेश पट्टधर) प.पू. रामेशजी म.सा. यांचा २६ वा पदारोहण दिवस देखील साजरा केला गेला. अर्चना साध्वी मंडळातर्फे महाराज साहेबांनी व मातीभाऊ मुणोत यांनी मनोगत व्यक्त केले.(ऑक्टोबर ०९: २०२५

जळगाव, महाराष्ट्र)

✒️शब्दांकन:-किशोर कुलकर्णी(मो:-9422776759)