✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114
बीड(दि.30सप्टेंबर):-रोजगार हमी योजने अंतर्गत गाव पातळीवर विविध कामे केली जात आहेत. या कामांवर संबंधित विभागाचे नियंत्रण असायचे मात्र आता यात काही प्रमाणात बदल करण्यात आले. वैयक्तिक जलसिंचन विहिर, शौचालय, शोष खड्डे, घरकुल इत्यादी कामांवर ग्रामपंचायतीचे नियंत्रण राहणार आहे. गावातील मजुरांना गावातच रोजगार मिळावा या उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेअंतर्गत व्यवस्थीतपणे कामे होत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.
संबंधित विभागाचे कामावर नियंत्रण असायचे त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळत असे. आता यामध्ये काहीसा बदल करण्यात आला. गाव पातळीवरील वैयक्तिक जलसिंचन विहिर, शौचालय, शोष खड्डे, घरकुल या कामांवर ग्रामपंचायतींचे नियंत्रण राहणार आहे. ग्रामपंचायतींनी संबंधित कामे करून घ्यायची आहेत. अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तालुका कृषी अधिकार्यांचे नियंत्रण
गावपातळीवर शेततळे कंपोस्ट फळबाग लागवड, बांधावर वृक्ष लागवड, गांडुळ खत निर्मिती, शेत बांध-बंदिस्ती इत्यादी कामे होत असतात.
या कामांवर तालुका कृषी अधिकारी यांचे नियंत्रण राहणार आहे तर रोपवाटिका, गावठाण बाहेरील वृक्ष लागवड व संगोपन, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड व संगोपन या कामांवर सामाजिक वणीकरणाचे नियंत्रण असणार आहे. पालकमंत्री पांदण रस्ता योजनेच्या कामावर महसूल विभाग नियंत्रण ठेवून असणार आहे.