▪️वार्षिक सभेमध्ये पायाभूत सुविधा व विद्यार्थी हिताचे निर्णय
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.20एप्रिल):– ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे माजी विद्यार्थी संघटनेची वार्षिक सभा शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी उत्साहात पार पडली. या सभेचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनंदा अस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सभेमध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी श्री. राहुल मसकर यांची एकमुखी निवड करण्यात आली.
सभेला माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी श्री. जयराम वावरे, श्री. सौरभ दांडे, श्री. निखिल भालेराव, श्री. सचिन भरडे, श्री. सूरज देशकर, श्री. राहुल मसकर आणि कु. अश्विनी रामटेके हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. हुमेश्वर आनंदे, डॉ. मृणाल वऱ्हाडे, डॉ. निलेश ठवकर तसेच प्रा. विवेक माणिक यांची उपस्थिती लाभली.
सभेमध्ये महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची चर्चा करण्यात आली. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त निर्णय घेण्यात आले.
अध्यक्षपदी निवड झालेल्या श्री. राहुल मसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांमध्ये अधिक चांगला समन्वय निर्माण करणार असून, नवीन उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा. नागेश ढोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या सभेमुळे महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.