✒️उमरखेड प्रतिनिधी(अत्तदिप धुळे)
उमरखेड(दि.23एप्रिल):-जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहागाव येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत वृक्षारोपणाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. उन्हाळ्यात लागणाऱ्या सावलीची जाणीव ठेवून, “उन्हाळ्यात पाहिजे असेल सावली तर झाडे लावा पाऊले पावली” अशा अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या उपक्रमात गावातील सामाजिक कार्यकर्ते अत्तदिप धुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जागतिक तापमानवाढ, पर्यावरणीय संकटे आणि भविष्यातील धोके याविषयी सखोल माहिती दिली. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रभावित होऊन विद्यार्थ्यांनी “आम्ही आमची पिढी धोक्यात येऊ देणार नाही,यासाठी सुरुवात स्वतःपासून करू” असा निर्धार केला.
चार-चार विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये विभागून आवळा, लिंब, जांभूळ, वड, अशोका यांसारख्या विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाच्या वेळी “झाडे लावा, झाडे जगवा” “वृक्ष संवर्धन हीच खरी सेवा” अशा प्रेरणादायी घोषणा दिल्या गेल्या.
या उपक्रमात शाळेच्या शिक्षिका जगताप मॅडम आणि जैन मॅडम यांनी देखील सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
ही उपक्रमशीलता विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करत असून, भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.