

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.13ऑगस्ट):- ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रेड रिबन क्लब आणि उपजिल्हा रुग्णालय, चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेड रिबन क्लबची स्थापना, जागतिक युवा दिन कार्यक्रम, अवयव दान नोंदणी कार्यशाळा आणि हर घर तिरंगा अभियानांतर्गत विविध उपक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. अश्विनी पिसे, वैद्यकीय अधिकारी (आयुष), श्रीमती जयश्री वाघमारे, आहारतज्ञ, श्री विश्वास महाबळे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती कामिनी हलमारे, समुपदेशक (आयसीटीसी), आणि कु. पूनम कांबळे, समुपदेशक (एनसीडी) उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. बिजनकुमार शिल, रासेयो कार्यक्रम अधिकारी, तसेच आभार प्रदर्शन डॉ. निलेश ठवकर, रेड रिबन क्लब समन्वयक, यांनी केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत संपन्न झालेले विविध उपक्रम;
*१. हर घर तिरंगा अभियान*: या अभियानांतर्गत महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, इत्यादींची घोषणा करण्यात आली. *२. रेड रिबन क्लबची स्थापना*: युवकांमध्ये एचआयव्ही/एड्सबाबत जनजागृती आणि रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली.
*३. जागतिक युवा दिन साजरा*: युवकांच्या सामाजिक जबाबदारी आणि योगदानाबाबत चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.
*४. अवयव दान नोंदणी कार्यशाळा*: अवयव दानाबाबत जनजागृती करून अनेकांनी अवयवदान साठी नोंदणी केली.
*५. एचआयव्ही एड्स जनजागृती रॅली*: एचआयव्ही एड्स विषयी परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.



