देशाच्या सुरक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असून यात तरुणांची भूमिका महत्त्वाची – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

54

 

 

नागपूर, (22 ऑगस्ट)-अनुशासित आणि देशभक्त युवा एक सुरक्षित देश घडवू शकतात. देशाच्या सुरक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असून यामध्ये तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपूरच्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था- व्हीएनआयटी येथे ‘राष्ट्रीय सुरक्षेत युवकांची भूमिका’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. बदल ही एक शाश्वत प्रक्रिया असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपले भविष्य अधिक सुरक्षित आणि आनंददायी बनवू शकतो, असे सांगताना गडकरी यांनी नवकल्पना, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संरक्षण क्षेत्राचा कायापालाट होत असल्याचे सांगितलं नागपुरात देखील ड्रोन स्वदेशी तंत्रज्ञान वापरून तयार होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पंतप्रधानांनी ठरवलेलं ‘आत्मनिर्भर भारत’ चे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने या दोन दिवसीय परिषदेत विषयतज्ञ अंतर्गत सुरक्षा, आर्थिक सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. युथ फॉर नेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद व्हीएनआयटीचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष, माडा भूषी मदन गोपाल यांनी भूषवले. स्वागत भाषण व्हीएनआयटीचे संचालक प्रा.प्रेमलाल पटेल यांनी केले.

 

या दोन दिवसीय परिषदेत अंतर्गत सुरक्षा ,सायबर सुरक्षा तसेच आर्थिक सुरक्षा या विषयावर विविध तज्ञ, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच माध्यमतज्ञ यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार असून, परिषदेच्या समारोपीय सत्रामध्ये शनिवारी, लेफ्टनंट जनरल व्ही.के. चतुर्वेदी, संदीप पाटील, भास्कर राव, लेफ्टनंट जनरल रविंदर सिंग पनवार, अरविंद त्रिपाठी, कमोडोर ए. आनंद (निवृत्त), डॉ. विनय कुमार सिंग, श्री ब्रिजेश सिंग, सुश्री सरिता कौशिक आणि एअर मार्शल शिरीष देव (निवृत्त) परिषदेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. परिषदेच्या उद्घाटकीय सत्राला व्हीएनआयटी, एम्स, आयआयएम नागपूर तसेच शहरातील विविध खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.