

चीनच्या शांघाय शहरात नुकतीच एक आंतरराष्ट्रीय शिखर परिषद पार पडली. या शिखर परिषदेत अनेक राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित होते मात्र सर्वांचे लक्ष होते ते जिनिपिंग, पुतिन आणि मोदी या चीन, रशिया आणि भारत या देशांच्या राष्ट्र प्रमुखांकडे. जिनिपिंग, पुतिन आणि मोदी हे तीन नेतेच या शिखर परिषदेत केंद्रस्थानी होते त्याचे कारणही तसेच होते अमेरिकेने भारत आणि चीनवर टाकलेल्या टॅरीफ बॉम्ब नंतर होणारी ही पहिलीच शिखर परिषद होती.
चीन आणि भारतावर टाकलेल्या टॅरीफ बॉम्बमुळे चीन आणि भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध बिघडले आहेत तर रशियाने युक्रेनशी सुरू असलेले युद्ध थांबवावे यासाठी पुतिन आणि ट्रम्प यांच्यात झालेली बैठक फिस्कटली त्यामुळे या दोन्ही देशात देखील तणाव निर्माण झाला त्या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद खूप महत्वाची मानली जात होती. अमेरिकेला शह देण्यासाठी ही परिषद आयोजित केली असे मानले जात होते त्यामुळे या शिखर परिषदेतून अमेरिकेला कोणता इशारा दिला जाईल याकडे जगाचे लक्ष लागले होते तसा इशारा या शिखर परिषदेतून अमेरिकेला दिलाही गेला. भारत, चीन आणि रशिया हे तिन्ही देश एकत्र आल्याचे या निमित्ताने जगाने पाहिले. भारत आणि रशिया यांची मैत्री तर जगजाहीर आहे आता भारत आणि चीन यांचे देखील संबंध सुधारत आहे.
जर हे तीन देश एकत्र आले तर अमेरिकेला शह देतील असा इशारा या निमित्ताने दिला गेला आणि तो अमेरिकेपर्यंत पोहचला देखील म्हणूनच या शिखर परिषदेनंतर अमेरिकेने भारतावर टीका केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टीम यांचे व्यापार विषयक सल्लागार आणि भारताचे विरोधक असलेले पीटर नवारो यांनी शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने मोदी, पुतिन आणि जिनिपिंग यांची झालेली भेट त्रासदायक असल्याचे म्हंटले आहे. भारताने चीन आणि रशिया सोबत नव्हे तर अमेरिका, युक्रेन आणि युरोप सोबत असायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. पीटर नवारो यांच्या या वक्तव्यातून भारताने रशिया आणि चीनशी केलेली युती अमेरिकेच्या मर्मावर बोट ठेवणारी ठरली हे स्पष्ट झाले. नवारो यांच्या या वक्तव्यातून शांघाय शिखर परिषदेचा हेतू सफल झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
भारत, चीन आणि रशिया हा त्रिकोण तयार झाल्यास अमेरिकेलाच त्याचा सर्वाधिक त्रास होईल असे जाणकारांनी याआधीच सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत असलेल्या निकी हॅले यांनी आधीच असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांना दिला होता तो खरा ठरताना दिसत आहे. आज भारत, रशिया आणि चीन एकत्र येत आहे त्याचा अमेरिकेला पोटशूळ झाला आहे पण याला तेच जबाबदार आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या हेकेखोर स्वभावामुळे अमेरिकेलाच अडचणीत आणत आहे काही कारण नसताना ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर भरमसाठ टॅरीफ लावले. भारत आणि चीनने विनंती करूनही ट्रम्प यांनी ते कमी केले नाही. त्यांना वाटले भारतावर टॅरीफ लावल्याने भारत झुकेल आणि ट्रम्प सांगेल तसे वागेल. कोणाचे कोणावाचून अडत नाही, प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो हे ते विसरले.
भारताने पर्याय शोधला आणि मग अमेरिकेला जाग आली. आता नवारो म्हणतात मोदींबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. मला भारतीय लोक खूप आवडतात. आज मोदी आवडतात म्हणणारे नवारो काही दिवसांपूर्वी मोदी आणि भारतावर टीका करत होते. वास्तविक भारताने अमेरिकेला कायम मित्र मानले. पंतप्रधान मोदी तर ट्रम्प यांना जाहीरपणे माय डिअर फ्रेंड डोनाल्ड असे म्हणत असे पण डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या हेकेखोर स्वभावामुळे भारतासारखा मित्र गमावला.
केवळ भारतच नाही तर भारतासारख्या अनेक देशांवर टॅरीफ लावून अमेरिकेने दुखावले आहे. भविष्यात ते देखील अमेरिके विरुद्ध एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. ट्रम्प यांच्या या आताताई भूमिकेचा अमेरिकेचे नागरिकही निषेध करत आहे. एकदा नव्हे तर दोनदा ट्रम्प यांच्या धोरणाविरुद्ध अमेरिकन नागरिक रस्त्यांवर उतरले होते मात्र त्यातूनही ट्रम्प यांनी काही धडा घेतला नाही. त्यांच्या आताताई धोरणामुळे चीन, रशिया, भारत असा नवा त्रिकोण तयार झाला. हा त्रिकोण जर मजबूत झाला तर भविष्यात अमेरिकेला नक्कीच शह देईल यात शंका नाही.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)



