वेकोली बल्लारपूर क्षेत्रात सदस्य नोंदणीत आयटक युनियन अव्वल

64

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.11सप्टेंबर):- वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोली) मधील कामगार संघटनांच्या सदस्यता पडताळणीत यावर्षी आयटक कामगार संघटनेने (AITUC) बल्लारपूर क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.   

         दरवर्षीप्रमाणे यंदाही वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये काम करणाऱ्या चारही कामगार संघटनांची चेक आँफ सिस्टीमद्वारे सदस्यता व्हेरिफिकेशन करण्यात आले. २०२५ साली झालेल्या या प्रक्रियेत पहिला टप्पा १८ ते २४ ऑगस्टदरम्यान तर दुसरा टप्पा ८ व ९ सप्टेंबर रोजी पार पडला. या संपूर्ण पडताळणी प्रक्रियेत बल्लारपूर क्षेत्रातील कामगारांनी आयटक संघटनेच्या कार्यपद्धतीवर दाखविलेला विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.

        संयुक्त खदान मजदूर संघ, आयटक बल्लारपूर क्षेत्र संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे या यशाला बळ मिळाले. गोवरी/पवनी ओपन कास्ट, सस्ती ओपन कास्ट माईन, बल्लारपूर ओपन कास्ट माईन, क्षेत्रीय कार्यशाळा आणि बल्लारपूर टाऊन अशा सर्व विभागांत आयटकने बाजी मारली.

        संघटनेने या विजयाचे श्रेय सर्व कामगार व महिला कामगारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला दिले आहे. कामगारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा देण्याचा निर्धार संघटनेने यावेळी व्यक्त केला. या निकालानंतर बल्लारपूर क्षेत्रात आयटक कामगार संघटना, पदाधिकारी आणि कामगारांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.