

चिमूर – गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या वतीने ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे विद्यापीठस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विद्यापीठ क्षेत्रातील विविध महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले. खेळाडूंनी दमदार चढाया, पकडी आणि शिस्तबद्ध खेळ दाखवत प्रेक्षकांचे मन भारावून टाकले.
स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुनंदा आसवले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेशचंद शर्मा, डॉ. मनोज अरमरकर, डॉ. उदय मेंढुलकर, डॉ. प्रकाश वैद्य, डॉ. राजेंद्र गोरे तसेच श्री. विक्की पेटकर हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत कबड्डी हा भारतीय परंपरेशी निगडीत खेळ असल्याचे प्रतिपादन केले आणि विद्यार्थ्यांनी खेळातून संघभावना, शिस्त व आत्मविश्वास आत्मसात करावा असे सांगितले.
अंतिम निकालांमध्ये आर.एस.एस. महाविद्यालय, विसापूर (जि. चंद्रपूर) संघाने विजेतेपद पटकावले. शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली द्वितीय, तर किशन खोब्रागडे महाविद्यालय, वैरागड (जि. गडचिरोली) तृतीय क्रमांकावर राहिले. विजेत्या व उपविजेत्या संघांना करंडक, पदके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन ग्रामगीता महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने केले. प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. संदीप सातव, डॉ. मृणाल वराडे, प्रा. समीर भेलावे, प्रा. प्रज्ञा खोब्रागडे, प्रा. नागेश ढोरे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



