पत्रकार आणि साहित्यिकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून राजकारणावर लेखन करणे आवश्यक- हंसराज अहिर

72

 

 

 

जगदीश का. काशिकर, विशेष प्रतिनिधी, मो. ९७६८४२५७५७.

 

नागपूर (दि. २७ सप्टेंबर): आजच्या लोकशाही व्यवस्थेत पत्रकारिता आणि साहित्यलेखन हे लोकप्रबोधनाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे पत्रकार आणि साहित्यिकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून राजकारणावर लेखन करणे आणि साहित्य निर्मिती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित शह-काटशह या राजकीय कथासंग्रहाच्या साहित्य भारतीच्या वतीने आयोजित प्रकाशन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून अहिर बोलत होते. स्थानिक धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात काल शुक्रवारी आयोजित या कार्यक्रमात दै. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, आकाशवाणीचे निवृत्त वृत्त संचालक आणि साहित्य भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री नितीन केळकर, साहित्य भारती, विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष लखन सिंह कटरे, विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत लाखे, प्रांत मंत्री सुनील शिनखेडे आणि लेखक अविनाश पाठक व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना हंसराज अहिर म्हणाले की राजकारणातील विविध घटनांचा आढावा घेऊन त्यावर नित्यनेमाने लेखन करणे हे पत्रकारांचे आणि साहित्यिकांचे कामच आहे. जर राजकारणी चुकत असतील तर परखडपणे त्यांच्या चुका दाखवून टीका करणारे लेखन देखील पत्रकारांनी आणि साहित्यिकांनी करायला हवे आणि त्याचे स्वागतही व्हायला हवे, असे अहिर यांनी सांगितले.

आज समाज माध्यमांचा मानवी जीवनावर वाढता प्रभाव असला तरी वृत्तपत्रे आणि ग्रंथ लेखनाचे महत्त्व कुठेही कमी झालेले नाही असे सांगून अहिर म्हणाले की आजही वृत्तपत्र आणि पुस्तक वाचण्याची आवड जोपासणारा वर्ग आहे. अशावेळी प्रबोधनात्मक साहित्य लिहिले जाणे स्वागतार्हच आहे असे त्यांनी सांगितले. राजकारणात तोच तो
पणा आल्यामुळे लोकांना राजकारण आवडेनासे होते. मात्र अविनाश पाठक यांच्यासारख्या लेखकांनी प्रबोधनात्मक लेखन केले तर त्याचा निश्चित फायदा होईल असेही अहिर म्हणाले.

*नीतिन‌ केळकर*

राजकीय पत्रकारिता करताना पत्रकारांवर बरीच बंधने येत असतात. बरेचदा अनेक गोष्टी खटकतात मात्र त्यांचे वृत्तांकन करता येत नाही. तिथे पत्रकाराला मर्यादा येतात. अशावेळी त्या घटनांना कथेच्या स्वरूपात मांडून वास्तव वाचकांपर्यंत नेता येते ते अविनाश पाठक यांना या राजकीय कथालेखनातून साधले आहे याकडे नितीन केळकर यांनी या पुस्तकावर भाष्य करताना लक्ष वेधले. हे हे कथालेखन करताना पाठकांनी राजकीय नेता आणि पत्रकार यांच्यातील संबंध जपत कुठेही अधीक्षेप न होऊ देता वास्तव जनसामान्यांसमोर मांडले आहे असे केळकर यावेळी बोलताना म्हणाले.

*श्रीपाद अपराजित*.

राजकारणातील वास्तव हे दरवेळी श्लील आणि सभ्य असेलच असे नसते. मात्र पत्रकाराला लिहिताना ते भान ठेवावे लागते. अविनाश पाठक यांनी आपल्या कथालेखानात राजकीय वास्तव मांडतानाच शीलतेचे आणि सभ्यतेचे भान सांभाळले आहे याकडे श्रीपाद अपराजित यांनी लक्ष वेधले. अविनाश पाठक यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात वृत्त छायाचित्रकार म्हणून केली. वृत्त छायाचित्रकाराला नेमका क्षण टिपण्याचे कसब सांभाळावे लागते. तेच कसब, तोच नेमकेपणा या लेखनात असल्याचे जाणवते असेही त्यांनी यावेळी सांगितले राजकारणातील वास्तव वाचकांसमोर मांडताना त्यांनी राजकारणातला कौटुंबिक जिव्हाळा जपत लेखनाचा तोल कुठेही ढळू दिला नाही असेही अपराधीत यावेळी म्हणाले.

*लखनसिंह कटरे*

आज लोकशाहीची मूल्य ढासळताना दिसत आहेत. अशावेळी ती सांभाळण्याचे आव्हान फक्त पत्रकार आणि साहित्यिकाची लेखणीच पेलू शकते असे प्रतिपादन साहित्य भारतीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष आणि पोवारी बोलीचे साहित्यिक ॲड. लखन सिंह कटरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

यावेळी दीपप्रज्वलानाने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य भारतीचे विदर्भ प्रांत मंत्री सुनील शिनखेडे यांनी केले. लेखक अविनाश पाठक यांनी आपल्या पत्रकारिता आणि साहित्यिक वाटचालीचा मागोवा घेत या कथालेखनामाची प्रेरणा विशद केली. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. आभार प्रदर्शन विनय माहुरकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वाती मोहरीर यांनी केले.

कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, स्तंभलेखक प्रकाश एदलाबादकर बालरोगतज्ञ डॉ. उदय बोधनकर नॉरकॉडचे डॉ. मुकुंद पैठणकर, डॉ. गणेश चव्हाण, स्वाती सुरंगळीकर, डॉ. शुभा साठे, डॉ तनुजा नाफडे या मान्यवरांसह रसिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.