समतेचा नवा पहाटेचा सूर्योदय : धम्मचक्र प्रवर्तन दिन

51

 

 

 

 

 

 

धम्म म्हणजे समतेचा दीप, प्रवर्तन दिन म्हणजे स्वाभिमानाचा उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड, पण हिंसेशिवाय. म्हणजेच, गुलामीतून स्वाभिमानाकडे प्रवास, अन्यायाविरुद्ध बंडाचे प्रतीक आणि समतेच्या नवा समाजव्यवस्थेचे बीजारोपण. १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस भारतीय समाजाच्या इतिहासात कायमस्वरूपी सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारून एका नवा युगाचा प्रारंभ केला आणि शतकानुशतकांची गुलामगिरी, शोषण, जातिभेद यांना छेद देत नवा युगारंभ केला. हा क्षण केवळ धर्मांतराचा नव्हता, तर तो होता मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा, समतेने श्वास घेण्याचा आणि आत्मसन्मानाने उभं राहण्याचा क्रांतिकारी क्षण. हा दिवस भारतीय इतिहासातील एक क्रांतिकारी वळण आहे. हाच तो क्षण होता ज्याने दलित, शोषित, वंचित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळे 14 ऑक्टोबर हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नसून, तो आशेचा, स्वाभिमानाचा आणि क्रांतीचा दिवस आहे. धम्मचक्र प्रवर्तनाचा सामाजिक संदेश, ते माणसाला माणसासमान जगण्याची शिकवण देते. बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा अधिष्ठान आहे ज्यात कोणतीही जात नाही, उच्च-नीचपणाचा भेद नाही. त्यामुळे धम्म स्वीकारणे म्हणजे आत्मसन्मान स्वीकारणे.

बाबासाहेबांनी सारनाथच्या धम्मचक्र फिरवणाऱ्या बुद्धांच्या परंपरेशी संगती साधत, आश्विन पौर्णिमेला दीक्षाभूमीवर धर्मचक्र फिरवले. त्या एका कृतीने त्यांनी पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या दास्याच्या साखळ्या तुटल्या आणि समतेच्या धर्माचा नवा प्रवास सुरू झाला. भारताच्या दीर्घ सामाजिक इतिहासात जातिव्यवस्था ही जखम होती. शेकडो वर्षे दलित समाजाला अपमान, अन्याय, अस्पृश्यतेच्या यातना सोसाव्या लागल्या. डॉ. आंबेडकरांनी आपल्या अभ्यास, संघर्ष आणि त्यागातून या व्यवस्थेविरुद्ध आवाज उचलला. अखेर त्यांनी ठामपणे जाहीर केले की, “मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही” आणि आपल्या शब्दाला जागत 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन लाखो जनतेला नवजीवन दिले. त्यामुळे या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या दिवशी बाबासाहेबांनी जे धाडस केले, त्यातून दलित समाजाने आपली गुलाम मानसिकता झटकून टाकली, हा दिवस म्हणजे “स्वाभिमान दिन” आहे. भगवान बुद्धांनी दिलेला धम्म हा कोणत्याही देवधर्माच्या अधीन नसून करुणा, प्रज्ञा आणि मैत्री यांवर आधारलेला आहे. त्यांनी शोषण, अंधश्रद्धा आणि हिंसेला नाकारलं, “अत्त दीपो भव” हा त्यांचा संदेश मानवाला आत्मबळ देणारा ठरला. जातीपातीच्या अंधाऱ्या विळख्यात अडकलेल्या समाजाला त्यांनी समानतेचा आणि ज्ञानाचा दीप दाखवला. बुद्ध धम्म हा कर्मकांडांचा मार्ग नाही, तर व्यवहाराचा आणि विचारांचा मार्ग आहे. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारा हा जीवनमार्ग आजही तितकाच सुसंगत आणि आवश्यक आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिन केवळ स्मरणोत्सव नसून तो आहे सतत जागवणारा चेतावणीचा नगारा. विषमता, दारिद्रय, अन्याय अजूनही समाजात आहे, अशा परिस्थितीत आजच्या पिढीसाठी 14 ऑक्टोबरचा संदेश असा आहे की, समता, न्याय आणि करुणा अधिक सामर्थ्याने पसरवण्याची गरज आहे. हा फक्त एका धर्मांतराचा दिवस नाही. तो भारतीय समाजाच्या पुनर्जन्माचा दिवस आहे. ज्यांनी अस्पृश्यतेच्या अंधःकारातून प्रकाशाकडे वाटचाल केली, त्यांचा हा उत्सव आहे. म्हणूनच आपण हा दिवस केवळ साजरा करावा असे नाही, तर जीवनपद्धतीत उतरवावा. तो होता मनुष्यत्वाचा उत्सव, तो होता अस्मितेचा पुनर्जन्म, तो होता न्याय, समता आणि बंधुत्वाच्या नव्या वाटचालीचा आरंभ. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हते, तर मानसिक गुलामीतून मुक्त होण्याचा शपथविधी होता. त्या दिवशी दीक्षाभूमीवर एकत्र जमलेला जनसागर पाहताना असे वाटले. जणू अंधाराने त्रस्त झालेले लाखो तारे एका सूर्याच्या प्रकाशाने उजळून निघाले. लोकांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण ते दु:खाचे नव्हते; ते होते आनंदमुक्तीचे अश्रू. शतकानुशतके अपमान सहन केलेल्या समाजाने पहिल्यांदाच उंच मान करून मोकळा श्वास घेतला. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या शिवाय मानवतेला अर्थ नाही. तसेच, हा दिवस आपल्याला शिकवतो की खरी ताकद ही संघटनेत, शिक्षणात आणि विचारांत आहे. बाबासाहेबांनी या दिवशी केवळ धर्मबदल केला नाही, तर त्यांनी समाजबदलाचा पाया घातला. त्यांनी दाखवलेला मार्ग हा विज्ञाननिष्ठ, तार्किक आणि मानवी अस्मिता जपणारा होता. आज, जेव्हा समाजात अजूनही असमानता, द्वेष आणि भेदभावाचे काटे टोचतात, तेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपल्याला पुन्हा पुन्हा जागं करतो. त्याकरिता आपण बुद्धधम्माचे वारसदार म्हणून करुणा आणि मैत्रीची बीजे रुजवली पाहिजेत. जात, धर्म, पंथ यांच्या भिंती मोडून प्रबुद्ध समाज निर्माण केला पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे, हीच खरी बाबासाहेबांना आणि बुद्धांना खरी वंदना ठरते.

नागपूरची भूमी, लाखोंचा सागर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तेजोमय संकल्प! तो फक्त एक दिवस नव्हता; तो पिढ्यान् पिढ्यांच्या अश्रूंचा शेवट आणि मानवतेच्या नव्या पहाटेचा उदय होता. या दिवशी दीक्षाभूमीवर एकत्र आलेल्या जनसमुदायाची अवस्था डोळ्यांसमोर आणली, तर अंगावर शहारे येतात. शतकानुशतकांच्या अन्यायाचे ओझे त्या दिवशी हलके झाले. “आता आपणही माणूस आहोत, समान हक्काचे आहोत” ही भावना आणि भावनिक दृष्टीकोन त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. तो केवळ धर्मांतर नव्हता; ती मानवी स्वातंत्र्याची घोषणा होती. आज आपल्याला 14 ऑक्टोबरचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. कारण जातिव्यवस्था आजही वेगवेगळ्या स्वरूपात दिसते. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ उत्सव नाही, तर तो आहे आपल्या अस्तित्वाची ओळख. हा दिवस आपल्याला सांगतो, “भूतकाळातील बेड्या आपण तोडल्या आहेत, आता भविष्याच्या प्रगतीचे दार आपण स्वतः उघडायचे आहे.” म्हणूनच या दिवशी आपण सर्वांनी करुणा, प्रज्ञा आणि समतेच्या मार्गावर चालत प्रबुद्ध भारत घडवण्याची प्रतिज्ञा करूया. 14 ऑक्टोबरच्या त्या ऐतिहासिक दिवशी सुरू झालेल्या प्रबुद्धतेच्या प्रवासाला आजही नवी ऊर्जा मिळो. सर्वांना ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा !