Home चंद्रपूर नव्या दमाच्या कलाकारांना मिळणार हक्काचे व्यासपीठ-बजाज धुनिव्हर्सचा ग्रँड फिनाले ३१ मार्चला

नव्या दमाच्या कलाकारांना मिळणार हक्काचे व्यासपीठ-बजाज धुनिव्हर्सचा ग्रँड फिनाले ३१ मार्चला

54

▪️शंकर एहसान लॉयच्या उपस्थितीत ठरणार व्हॉइस ऑफ नेशन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.27मार्च):-भारतीय संगीत क्षेत्रातील नव्या दमाच्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘बजाज धुनिव्हर्स’ या डिजिटल-फर्स्ट संगीत टॅलेंट हंटचा भव्य समारोप ३१ मार्च रोजी मुंबईत होणार आहे. बजाज फिनसर्व्हच्या या उपक्रमाद्वारे ‘व्हॉइस ऑफ नेशन’चे अनावरण केले जाणार असून, यासाठी दिग्गज संगीतकार जोडी शंकर-एहसान-लॉय परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या शोधमोहिमेचा हा अंतिम टप्पा अतिशय चुरशीचा ठरणार आहे.

बजाज धुनिव्हर्सने पारंपारिक ऑडिशनच्या मर्यादा ओलांडून तंत्रज्ञानाचा वापर करत देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभेला साद घातली. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू झालेल्या या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोणत्याही टेलिव्हिजन जाहिरातीशिवाय, केवळ डिजिटल माध्यमातून ६०,००० हून अधिक इच्छुकांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ सबमिशन सादर केले. या प्रक्रियेतून पहिल्या १०० स्पर्धकांची निवड करण्यात आली, ज्यांना शंकर-एहसान-लॉय यांनी डिजिटल एपिसोड्सच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. आता यातून निवडलेले १० अंतिम स्पर्धक आणि १ वाईल्ड कार्ड स्पर्धक मुंबईतील ग्रँड फिनालेमध्ये आपली कला सादर करतील.

या उपक्रमाबद्दल बोलताना डिजिटल प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष मानव मियानवाल म्हणाले की, संभाव्य क्षमतांचा वापर करणारी आणि नवीन आदर्श निर्माण करणारी व्यासपीठे तयार करण्यासाठी आम्ही देशाचे आणि लोकांचे देणे लागतो. आम्ही परफॉर्मिंग आर्ट्स आणि संस्कृती या क्षेत्रांतील प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवले असून, बजाज धुनिव्हर्स ही आमची दीर्घकालीन वचनबद्धता आहे. पहिल्या वर्षात मिळालेला प्रतिसाद आम्हाला भविष्यात हे काम आणखी मोठे करण्याचे धैर्य देतो.

विजेत्या स्पर्धकासाठी हा प्रवास स्वप्नवत असणार आहे. ‘व्हॉइस ऑफ नेशन’ ठरणाऱ्या कलाकाराला झी म्युझिक कंपनीसोबत स्वतःचा स्वतंत्र अल्बम प्रदर्शित करण्याची संधी मिळेल. त्याशिवाय, शंकर-एहसान-लॉय यांच्यासोबत स्पॉटिफाई रिलिजवर काम करण्याचे आणि बजाजची ‘सॉनिक आयडेंटिटी’ (अँथम) तयार करण्याचे भाग्य लाभणार आहे. हा संपूर्ण सोहळा बजाज धुनिव्हर्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर जगभरातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे.