बोगस बियाणे प्रकरणी टोमॅटो उत्पादकांचा उपोषणाचा इशारा

    59
    Advertisements

    ✒️अकोले(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    अकोले(दि.9फेब्रुवारी):-टोमॅटोच्या बोगस बियाणे प्रकरणी इंदोरी (ता. अकोले) येथील शेतकर्‍यांनी बीयाणे उत्पादक कंपनीवर कारवाई संदर्भात होत असलेल्या दिरंगाई बद्दल अकोले कृषी विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.या संदर्भात मुख्यमंत्री, कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, आ. डॉ. किरण लहामटे, अकोले कृषी अधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकोले तालुक्यातील विश्‍व हायटेक नर्सरी वीरगाव, सत्यजित हायटेक नर्सरी कळस, माऊली हायटेक नर्सरी सुगाव या रोपवाटिकांमधून सेमिनिस कंपनीच्या विरांग ह्या जातीच्या टोमॅटोची रोपे महागड्या दराने खरेदी केली होती.

    कंपनीचे प्रतिनिधी व रोपवाटिका चालकांनी विरांग जातीचे रोपे घेण्यास आग्रही भूमिका घेतली. आम्ही शेतकर्‍यांनीही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महागड्या दराने रोपे घेत, नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये टोमॅटो लागवड केली. त्यानंतर कर्ज काढून उसनवारी करून त्या पिकास खते, औषधे, तारकाठी, फवारणी आदी पीक व्यवस्थापनाचा लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र त्या टोमॅटोचे फळ काढणीला आल्यावर एकाच झाडामध्ये विविध रंगांचे वेगवेगळी फळे दिसू लागली.

    चांगले भाव असतानाही टोमॅटो विक्रीसाठी नेल्यावर व्यापारी व ग्राहक या टोमॅटोस हातही लावत नव्हते. तिरंगा रंगाचे व बिगर चवीचे फळ असल्याने हे बियाणे बोगस असल्याचा संशय शेतकर्‍यांना आला आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही शेतकर्‍यांनी हे पीक उभे केले. मात्र या बोगस बियाण्यांमुळे लाखो रुपयांचा फटका टोमॅटो उत्पादकांना बसला असून कृषी विभागाने तत्काळ पंचनामे न केल्यास बाळासाहेब देशमुख, संतोष नवले, जितेंद्र नवले, अनिल नवले, निखिल नवले, रामनाथ नवले आदी शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.