

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.21मे):- मे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा सन्मान ठेवत महाराष्ट्र राज्यातील टीईटी उत्तीर्ण झालेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांना प्राधान्य देवून पदोन्नती प्रक्रिया व्हावी यासाठी राज्यातील सेवाजेष्ठ शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
महाराष्ट्र टीईटी / सीटीईटी सिनिअर शिक्षक कृती समितीच्या वतीने निमंत्रक प्रसाद पाटील व इतर यांच्या नावे नुकतीच सर्वोच्च न्यायालयात एसएलपी दाखल करण्यात आली आहे.राज्यातील उच्च न्यायालयाच्या विविध खडपीठ यांनी वेगवेगळे निर्णय दिले असल्याने राज्यातील शिक्षक पदोन्नती प्रक्रियेत गुंता निर्माण झाला आहे.
मे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठ यांच्या 3 निर्णयामध्ये पदोन्नती प्रक्रियेमध्ये पदोन्नती समिती (डीपीसी) बैठकीच्या दिनांकास टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नतीसाठी पात्र समजण्यात यावे या आशयचे निर्देश दिले आहेत. मे. मुंबई उच्च न्यायालय यांनी दि. 01/08/2019 च्या शासन निर्णयाचा संदर्भ देत दि. 01/ 09/ 2025 रोजी टीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना पात्र संजण्यात यावेत असा दिलेला निर्णय टीईटी उत्तीर्ण असलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांच्यावर अन्यायकारक असल्याने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
राज्याचे शिक्षण संचालक यांच्या दि. 14/05/2026 पत्रातील शेवट्याच्या परिच्छद मध्ये मा. न्यायालयचे आदेश व प्रचलित तरतुदी विचारात घेवून पदोन्नती कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनास दिले आहेत. मात्र या पत्राचा वेगळा अर्थ लावत सेवानिष्ठ शिक्षकांना पदोन्नती दिली जात आहे.
मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दि. 01/09/2025 च्या निर्णयाचा संबंध त्यामागील 2019 च्या शासन निर्णयाशी जोडणे हे न्यायसंगत नसल्याने दि. 01/09/2025 नंतरचे पदोन्नती बाबतचे नवीन शासन धोरण जाहीर होणे आवश्यक आहे. अन्यथा 56-57 व्या वर्षी टीईटी उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे.
दि. 01/08/2019 च्या शासन निर्णय मधील मुद्दा क्रमांक ‘ इ ‘ नुसार पदोन्नती समितीची बैठक 30 सप्टेंबर 2025 पूर्वी होणे अपेक्षित होते . पण तसे झालेले नाही. त्यामुळे सध्या ज्या महिन्यात डीपीसी बैठक होत आहे त्या महिन्यातील दि. 01 ची पात्रता पदोन्नतीसाठी विचारात घेणे आवश्यक आहे. अन्यथा फक्त दिनांकच्या कारणास्तव टीईटी उत्तीर्ण असलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांना वगळून पदोन्नती दिल्यास सर्व ज्युनिअर शिक्षक पदोन्नत होणार असल्याने त्या जागा अनेक वर्षे रिक्त होणार नाहीत. आणि पात्र असूनही सेवाजेष्ठ शिक्षकांना पदोन्नतीशिवाय सेवानिवृत्त व्हावे लागणार आहे.
असे महाराष्ट्र टिईटी सीटीईटी कृती समितीचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश गिलोरकर, प्रल्हाद पाल,अनंता रासेकर,सुरज नखाते, सुंदर गावडे, विठोबा मडावी, किशोर आनंदवार, गंगाधर बोढे, धनराज शेंडे, किशोर खेडेकर, घुटके व इतर टिईटी सिटीईटी धारक शिक्षकांची मागणी असल्याचे कळविले आहे.







