Home नागपूर समाजात शांतता, बंधुता आणि शिक्षणातूनच खरी समानता निर्माण होऊ शकते – प्रवीण...

समाजात शांतता, बंधुता आणि शिक्षणातूनच खरी समानता निर्माण होऊ शकते – प्रवीण बागडे

33

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.24मे):-नागपूरच्या लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात शनिवार, दि. २३ मे २०२६ रोजी बहुजन हिताय संघाची ४७१ वी साप्ताहिक सभा सकाळी ९.०० वाजता उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मा. आयु. संजीव गाडे (माजी उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. आयु. प्रवीण बागडे (प्रशासनिक अधिकारी, साहित्यिक, लेखक व कवी) तसेच विशेष अतिथी म्हणून मा. आयु. अशोक बागुल उपस्थित होते. 

        सभेची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्रिशरण, पंचशील व बुद्धवंदनेने करण्यात आली. बौद्धाचार्य देविदास राऊत यांनी आनापानसतीचे मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी प्रवीण बागडे यांनी उपस्थितांकडून बावीस प्रतिज्ञा वदवून घेतल्या. आपल्या मनोगतात त्यांनी समाजात शांतता, बंधुता व सामाजिक एकता प्रस्थापित होण्याची गरज अधोरेखित केली. शिक्षणामुळेच खरी सामाजिक समानता निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. तसेच शिक्षण क्षेत्रातील वाढत्या बाजारीकरणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या कार्याचा गौरव संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

       सभेत विविध वक्त्यांनी धम्म, समाजप्रबोधन, शिक्षण व सामाजिक एकता या विषयांवर मार्गदर्शन केले. विशेष अतिथी अशोक बागुल यांनी मानवतावादाचा संदेश दिला, तर अध्यक्ष संजीव गाडे यांनी धम्मदीक्षा व सामाजिक मूल्यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चुन्नीलाल जांभूळकर यांनी केले. समापन गाथा व राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.