Home मगसवड ईदुल-अजहा (कुर्बानी)चे आर्थिक आणि सामाजिक पैलू

ईदुल-अजहा (कुर्बानी)चे आर्थिक आणि सामाजिक पैलू

37

भारतात बकराईद म्हणून प्रचलित असलेल्या ईद चे वास्तविक नाव ईदुल-अजहा आहे.जो इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण आहे. हा सण केवळ धार्मिक विधी किंवा प्राण्यांच्या कुर्बानीपुरता मर्यादित नसून त्यामागे त्याग, समर्पण, सामाजिक न्याय, आर्थिक समतोल आणि मानवतेचा गाढ संदेश दडलेला आहे. प्रेषित हज़रत इब्राहीम (अलै.) आणि प्रेषित हज़रत इस्माईल (अलै.) यांच्या अल्लाहप्रती असलेल्या पूर्ण आज्ञाधारकतेची आणि बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

कुर्बानी ही स्वतःच्या अहंकाराची,स्वार्थाची, लोभाची आणि अन्यायकारी प्रवृत्तीची त्याग करण्याची आठवण देते. त्यामुळे ईदुल-अजहा हा केवळ धार्मिक सण नसून सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक समतोल निर्माण करणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

_कुर्बानीचा धार्मिक आणि मानवी संदेश_

इस्लाममध्ये कुर्बानी ही अल्लाहप्रती निष्ठा,समर्पण आणि तक्वा (ईशभय) यांचे प्रतीक मानली जाते. कुरआनमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की,

“अल्लाहपर्यंत त्यांच्या मांसाचा किंवा रक्ताचा पोहोच होत नाही, तर तुमचा तक्वा(ईश भय) पोहोचतो.”

      (सुरह अल-हज्ज : 37)

यावरून हे स्पष्ट होते की इस्लाममध्ये कुर्बानीचा उद्देश दिखावा किंवा बाह्य स्वरूप नसून अंतःकरणातील पवित्रता आणि मानवतेची भावना आहे.

_कुर्बानीचे आर्थिक पैलू_

# गरीब आणि गरजूंसाठी अन्नसुरक्षा

ईदुल-अजहाच्या वेळी कुर्बानीचे मांस तीन भागांत वाटण्याची परंपरा आहे —

एक भाग स्वतःसाठी, दुसरा नातेवाईकांसाठी आणि तिसरा गरीब व गरजूंना.

या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पौष्टिक अन्न पोहोचते. अनेक गरीब कुटुंबांना वर्षातून एकदाच मांस खाण्याची संधी मिळते. त्यामुळे कुर्बानी ही सामाजिक अन्नवाटपाची आणि आर्थिक समतेची प्रभावी व्यवस्था ठरते.

#पशुपालन व्यवसायाला चालना

कुर्बानीमुळे पशुपालन क्षेत्राला मोठा आर्थिक आधार मिळतो. ग्रामीण भागातील हजारो शेतकरी आणि पशुपालक वर्षभर बकऱ्या (जनावरे)वाढवतात आणि ईदुल-अजहाच्या काळात त्यांची विक्री करतात.

यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते,

बेरोजगारांना रोजगार मिळतो,

पशुखाद्य, वाहतूक, बाजारपेठ, पशुवैद्यकीय सेवा यांसारख्या क्षेत्रांनाही चालना मिळते.

भारतासारख्या कृषिप्रधान देशात हा सण ग्रामीण अर्थचक्राला गती देणारा ठरतो.

# लघुउद्योग आणि बाजारपेठेची वाढ

ईदुल-अजहाच्या निमित्ताने अनेक छोटे व्यवसाय सक्रिय होतात.

उदा.दोरी,चारा, जनावरांची सजावट,

चामड्याचे उद्योग,

वाहतूक व्यवसाय,

कपडे आणि किरकोळ बाजार.

विशेषतः चामड्याच्या उद्योगाला मोठ्या प्रमाणात कच्चा माल उपलब्ध होतो. त्यामुळे हजारो कामगारांना रोजगार मिळतो.

*आर्थिक पुनर्वाटपाची प्रक्रिया*

कुर्बानी ही संपत्तीच्या पुनर्वाटपाचे एक माध्यम आहे. श्रीमंत व्यक्ती आपल्या संपत्तीचा काही भाग अल्लाहच्या मार्गात खर्च करते आणि त्याचा लाभ गरीबांना मिळतो.

ही प्रक्रिया समाजात आर्थिक विषमता कमी करते,

सहजीवनाची भावना निर्माण करते,

सामाजिक सुरक्षिततेचे वातावरण तयार करते.

_कुर्बानीचे सामाजिक पैलू_

*बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य*

कुर्बानीमुळे समाजात प्रेम, बंधुभाव आणि परस्पर सहकार्य वाढते. श्रीमंत-गरीब, नातेवाईक-शेजारी सर्वजण एकमेकांशी आनंद वाटून घेतात.

मटण वाटपाच्या माध्यमातून सामाजिक संबंध अधिक दृढ होतात. समाजातील दुर्लक्षित लोकांनाही सणाच्या आनंदात सहभागी होता येते.

 *त्याग आणि संयमाचे शिक्षण*

ईदुल-अजहा माणसाला त्याग, संयम आणि समर्पण शिकवते. हजरत इब्राहीम (अलै.) यांनी स्वतःच्या प्रिय पुत्रालाही अल्लाहच्या आदेशासाठी अर्पण करण्याची तयारी दाखवली.

आजच्या भौतिकवादी युगात हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. मनुष्याने स्वतःच्या स्वार्थावर नियंत्रण ठेवून समाजहिताचा विचार करणे आवश्यक आहे.

# मानवतावादी समाजनिर्मिती

कुर्बानीची भावना केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नाही. ती समाजातील दुर्बल घटकांप्रती संवेदनशीलता निर्माण करते.

जर कुर्बानीच्या माध्यमातून :

भुकेल्याला अन्न, गरीबाला मदत, अनाथाला आधार,गरजूंना सहकार्य मिळाले,

तर समाज अधिक न्याय्य आणि मानवी मूल्यांवर आधारित बनू शकतो.

 *महिलांची भूमिका आणि कुटुंबव्यवस्था*

इस्लाममध्ये कुटुंबव्यवस्थेला अत्यंत महत्त्व आहे. बीबी हाजरा यांच्या त्यागातून स्त्रीची सहनशीलता, विश्वास आणि कुटुंबघडणीतील भूमिका स्पष्ट होते.

एक सुसंस्कृत कुटुंब समाजाला चांगले नागरिक देते. त्यामुळे महिलांचे नैतिक आणि सामाजिक योगदान समाजनिर्मितीसाठी आवश्यक आहे.

कुर्बानी करताना स्वच्छता,पर्यावरण संरक्षण, सामाजिक जबाबदारी, गरजूंना प्राधान्य या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

म्हणून ईदुल-अजहा हा केवळ धार्मिक उत्सव नाही,तर त्याग, सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि मानवतेचा संदेश देणारा महान सण आहे.कुर्बानीचे खरे तत्त्व म्हणजे अल्लाहप्रती निष्ठा, गरीबांविषयी करुणा आणि समाजासाठी समर्पण.

जर कुर्बानीची भावना आपल्या दैनंदिन जीवनात उतरली,तर समाजात आर्थिक समतोल, सामाजिक ऐक्य, नैतिकता, मानवता,यांचा विकास होईल.

त्यामुळे कुर्बानी सोबतच आपण आपल्यात असलेल्या स्वार्थ, अन्याय, अहंकार आणि द्वेष दुर्गुणांची सुद्धा कुर्बानी करू आणि त्याग आणि समर्पणाच्या या सणाला सर्व मिळून सोबत साजरे करू.

✒️सैय्यद सलमान(पुसद)मो:-9158949409