

२६ मे १९२८ रोजी जळगावला न्यायालईन काम असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जळगाव येथे ‘ महार वतन परिषद ‘ आयोजित करण्या बाबत सेनु नारायण मेढे , धनजी रामचंद्र बिऱ्हाडे यांना सांगितले होते , त्यावरून ही परिषद .व . वा . वाचनालयाच्या ग्राऊंडवर सायंकाळी ६.०० वाजता घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी राजमल लखीचंद जैन ( मारवाडी ) होते. दिवसभर न्यायालयाचे काम करून बाबासाहेब परिषदेच्या ठिकाणी आले तेंव्हा त्यांच्या जय जयकाराच्या प्रचंड घोषणा देण्यात आल्या . रजमल लखीचंद जैन यांनी अध्यक्षीय भाषणात महार वतन विधेयकास पाठिंबा असल्याचे सांगून या करिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . जैन यांच्या भाषणाचा संदर्भ बाबासाहेबांनी या विधेयकावर मुंबई विधानसभेत चर्चा करताना दिला व विधानसभा अध्यक्षांच्या लक्षात आणून दिले की , या प्रश्नावर केवळ अस्पृश्य लोकच आपली भूमिका मांडत नाही तर इतर लोक सुद्धा संवेदनशीलतेने बोलतात . महार वतन विधेयक मंजूर करून घेण्यात जळगावच्या या सभेचे अनन्य साधारण महत्व आहे . या परिषदेला ३००० पेक्षा अधिक लोक हजर होते .
याच परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण सुरू असताना पुण्याच्या समता समाज संघाने पाठविलेली तार त्यांना देण्यात आली . बाबासाहेबांनी ती तार कोटाच्या खिशात ठेऊन भाषण सुरू ठेवले . भाषण संपल्यावर ती तार वाचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठा धक्का बसला. त्या तारेत लिहिले होते की , श्रीधर बळवंत टिळक ( भारतीय स्वातंत्र्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर होती त्या बाळ गंगाधर टिळक यांचे सुपुत्र ) यांनी पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या केली . बाबासाहेबांनी उपस्थित जनतेला ही माहिती देऊन श्रद्धांजली अर्पण केली. आणि ते लगेच रेल्वेने मुंबई येथे रवाना झाले.

✒️जयसिंग वाघ(जळगाव)मो:-९८८१९२८८८१







